पुणे : प्रतिनिधी
देवगड हापूस आंब्याच्या नावाने करण्यात येणा-या अन्य आंब्याच्या विक्रीला प्रतिबंध होण्यासाठी आता देवगड हापूस आंब्यावर युनिक आयडी कोड सक्तीचे करण्यात आले आहे. याबाबत देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने पुढाकार घेतला आहे.
संस्था संचालक सदस्य ओंकार सप्रे यांनी ही माहिती पत्रकारांना सांगितली. ते म्हणाले प्रत्येक देवगड हापूस आंब्यावर हे विशेष यूआयडी स्टीकर लावणे बंधनकारक असणार आहे तरच त्याची विक्री अथवा विपणन करता येणार आहे. देवगडचा आंबा हा गेली अनेक वर्षे त्याच्या सुगंधासाठी आणि चवीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणावर मागणी असते.
मात्र गेल्या काही वर्षांत देवगड म्हणून अन्य आंबे विक्रीसाठी करण्यात येत असून त्याचे प्रमाण मोठे आहे. यामुळे देवगडमधील आंबा उत्पादक शेतक-यांचे नुकसान होत आहे हे लक्षात घेऊन संस्थेने टीपी सील यूआयडी सक्तीचे केले आहे. यासाठी संस्थेने संबंधित संस्थेबरोबर करार केला आहे
संस्थेच्या वतीने आंबा उत्पादक शेतक-यांना हा कोड उपलब्ध करून देण्यात आला आहे. वर्षाला साधारणपणे ३० ते ३५ हजार टन देवगड आंब्याचे उत्पादन होते. या नवीन कोडबाबत यापूर्वी चाचणी घेण्यात आली असून ती यशस्वी झाली आहे त्यामुळे ही नवीन प्रणाली आणली आहे असे ते म्हणाले.