‘ए मेरे वतन के लोगो…’ या देशातच नाही तर संपूर्ण जगावर छाप पाडणा-या गीताच्या रचनाकाराचे नाव कवी प्रदीप. त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामापासून ते चीनच्या युद्धकाळापर्यंत देशाला एकाहून एक सरस देशभक्तपर गीते दिली. स्वातंत्र्यानंतरही प्रदीप यांनी नव्या दमाने देशभक्तवर आधारित गीत लेखन केले. १९६० च्या दशकांत प्रेक्षकांची आवड बदलली.पाश्चात्य संगीतावर आधारित गाणी आवडू लागली. परिणामी, प्रदीप यांच्यासारख्या गीतकारांकडे दुर्लक्ष हेऊ लागले. परंतु त्यांनी ७१ चित्रपटांतून १७०० गीतांचे लेखन केले आहे. ११ डिसेंबर १९९८ मध्ये प्रदीप यांची प्राणज्योत मालवली. पण त्यांची अजरामर देशभक्तपर गीते आणि कविता कालही होत्या, आजही आहेत आणि उद्याही वाजत राहतील.
१५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारी येताच ‘ऐ मेरे वतन के लोगो’ या अजरामर गीताचे स्वर कानावर पडू लागतात. शाळा असो, ग्रामपंचायतीचे कार्यालय असो किंवा कर्तव्यपथावरील संचलन असो ‘ऐ मेरे वतन के लोगो…’ ऐकल्याशिवाय स्वातंत्र्यदिन किंवा प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित होणा-या कार्यक्रमांची सांगता होत नाही. देशातच नाही तर संपूर्ण जगावर छाप पाडणा-या या गीताच्या रचनाकाराचे नाव कवी प्रदीप होय. त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामापासून ते चीनच्या युद्धकाळापर्यंत देशाला एकाहून एक सरस देशभक्तीपर गीते दिली. दूर हटो ऐ दुनियावालो… आणि दे दी हमे आझादी… यांसारखी गीतेही ऐकावयास मिळतात. त्यांनी देशातील जनतेत देशभक्तीची ज्योत आपल्या गीतांच्या माध्यमातून तेवत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
कवी प्रदीप यांचे मूळ नाव रामचंद्र नारायण द्विवेदी. त्यांचा जन्म १९१५ मध्ये उज्जैनजवळील बादनगर येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांना विद्यार्थीदशेपासूनच कविता लिहिण्याची आवड होती. लखनौला पदवीचे शिक्षण घेत असताना त्यांच्या गीतांना बहार आली. प्रसिद्ध गीतकार बालभद्र प्रसाद दीक्षित यांचे मोठे चिरंजीव गिरीजा शंकर दीक्षित यांच्या संपर्कात आल्याने प्रदीप यांचे कवीमन आणखीच जागृत झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रदीप हे शिक्षक होण्याचा प्रयत्न करत होते. १९३९ मध्ये त्यांनी मुंबईत एका कविसंमेलनात सहभाग घेतला. तेथे बॉम्बे टॉकीजचे हिमांशू राय यांनी त्यांच्या रचना ऐकल्या आणि त्यांना आपल्या चित्रपटात गीत लिहण्यासाठी निमंत्रण दिले. यानंतर प्रदीप हे बॉलिवूडमध्ये गीतकार झाले आणि ते मुंबईतच राहू लागले. देशभक्तीने भारावलेल्या गीतांना भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या आंदोलनात अधिक प्रसिद्धी मिळाली.
इंग्रजांविरोधात चातुर्याने गीतांचा वापर स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात ‘किस्मत’ प्रदर्शित झाला.
त्यावेळी संपूर्ण देशभरात भारत छोडो आंदोलन सुरू होते आणि देशातील सर्वच नेते तुरुंगात होते. तत्कालीन काळात इंग्रजांविरुद्ध लिहिणे, बोलणे आणि गाण्यावर बंदी होती. कवि प्रदीप यांनी चातुर्याने ‘किस्मत’ चित्रपटासाठी ‘आज हिमालय की चोटी से फिर हमने ललकारा है’ गीतलेखन केले. या गीतात जर्मन आणि जपानी शब्दांचा वापर झाला.
‘शुरू हुआ है जंग तुम्हारा, जाग उठो हिंदुस्थानी
तुम न किसी के आगे झुकना जर्मन हो या जापानी
आज के लिए यही कौमी नारा, दूर हटो ऐ दुनियावालों हिंदुस्थान हमारा है।’
ब्रिटिश राज्यकर्ते आणि अधिका-यांना गीताचा पुरेसा अर्थ समजला नाही. कारण इंग्रज दुस-या महायुद्धात जर्मनी आणि जपानविरोधात लढत होते आणि इंग्रजांना हे गीत आपल्याच बाजूने असल्याचे वाटले. या संभ्रमात सेन्सॉर बोर्डने या गीताला मंजुरी दिली. मात्र गीतातील ‘दूर हटो ऐ दुनियावालो, हिंदुस्थान हमारा है’ या ओळीतूनच हे इंग्रजविरोधातला नारा असल्याचे भारतीयांना कळून चुकले. देशभक्तीची भावना जागरूक करण्यासाठीच हे गीतलेखन केले होते. त्यामुळे भारतीय प्रेक्षक देखील चित्रपटगृहात हेच गीत वारंवार लावण्याची मागणी करत असत. देशभरातील चित्रपटगृहांत ‘वन्स मोअर, वन्स मोअर’चा आवाज घुमायचा आणि प्रेक्षकांचे समाधान करण्यासाठी ते गाणे पुन्हा पुन्हा दाखविले जायचे. ‘किस्मत’ चित्रपटाने तत्कालीन काळात बॉक्स ऑफिसवर जोरदार यश मिळवले. एका चित्रपटगृहात तर हा चित्रपट साडेतीन वर्षे चालला. प्रदीप हे आपल्या ध्येयात यशस्वी झाले. भारतीयांच्या मनात देशभक्तीची भावना जागविण्यात या गीताने महत्त्वाची भूमिका बजावली आणि इंग्रजांना त्याचा थांगपत्ताही लागला नाही.
ब्रिटिश सरकारला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि गीताचा खरा अर्थ वेगळाच आहे, हे जेव्हा समजले तेव्हा त्यांनी कवी प्रदीप यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढले. अटकेपासून बचाव करण्यासाठी प्रदीप यांना भूमिगत राहावे लागले. या गीताचा उल्लेख करत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आठवणीत लिहिले की, प्रदीप हे दूरदृष्टी बाळगणारे कवी होते. त्यांनी चित्रपटाची क्षमता ओळखून एक सशक्त माध्यमाच्या रूपातून त्याचा वापर केला.
स्वातंत्र्यानंतरही प्रदीप यांनी नव्या दमाने देशभक्तीवर आधारित गीतलेखन केले. ‘जागृति’ मध्ये त्यांनी महात्मा गांधी यांच्या सन्मानार्थ गीतलेखन केले. ‘दे दी हमे आझादी बिना खङ्ग बिना ढाल’. नेहरुजींच्या सन्मानार्थ त्यांनी, ‘हम लाए है तुफान से किश्ती निकाल के’ हे देखील खूप लोकप्रिय ठरले. त्यांचेच आणखी एक अजरामर गीत ‘ऐ मेरे वतन के लोगों….’. याचा एक किस्सा १९६२च्या भारत-चीन युद्धाशी संबंधित आहे.
प्रदीप यांनी परमवीर चक्र विजेते मेजर शैतानसिंह भाटी यांच्याबाबत ऐकले होते. त्यांच्या हौतात्म्याने भारावून जात त्यांनी ‘ऐ मेरे वतन के लोगों…’ ची रचना केली आणि ते देशातील सर्वोत्तम देशभक्ती गीत मानले जाते. या गीतासाठी प्रदीप यांना भारत सरकारने राष्ट्रीय कवी म्हणून गौरविले. हे गीत लता मंगेशकर यांनी म्हणावे, अशी प्रदीप यांची इच्छा होती. पण संगीतकार सी. रामचंद्र आणि लता मंगेशकर यांच्यात ताणाताणी सुरू हाती. त्यामुळे रामचंद्र हे आशा भोसलेंकडून गीत म्हणवून घेण्याची तयारी करत होते. परंतु प्रदीप हे लताबाबत ठाम होते. शेवटी रामचंद्र यांनी हात टेकले आणि तुम्हीच लता मंगेशकर यांना गाणे म्हणण्यासाठी तयार करा, माझी हरकत नाही, असा निरोप दिला. प्रदीप हे लता मंगेशकर यांच्याकडे केले आणि तुम्ही रामचंद्र यांचे नाव घेताच चिडू नका, अगोदर गाणे ऐका, अशी विनंती केली. तेव्हा गीताचे बोल ऐकून लता मंगेशकर यांना रडू कोसळले आणि त्या गाणे म्हणण्यास तयार झाल्या. मात्र सरावाच्या वेळी आणि रिकॉर्डिंगच्या वेळी प्रदीप उपस्थित राहतील, अशी अट घालण्यात आली. याप्रमाणे २६ जानेवारी १९६३ प्रजासत्ताकदिनाच्या दिवशी पंडित नेहरू यांच्यासमोर हे गाणे म्हटले गेले आणि हे गीत ऐकून त्यांनाही अश्रू आवरता आले नाहीत.
-सोनम परब