मुंबई : वृत्तसंस्था
पश्चिम आशियात इस्त्रायल-इराणमध्ये भडकलेल्या युद्धाचा परिणाम भारतासह जगभरात दिसण्याची चिन्हे स्पष्ट होत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाच दिवसात कच्च्या तेलाच्या किमतीत ५ टक्क्यांची वाढ झाली आहे. हे युद्ध जसे वाढत जाईल तसे कच्च्या तेलाच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचा फटका भारताला बसणार असून पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा भडका उडण्याची शक्यता आहे.
इस्त्रायलचे लेबनॉनवरील हल्ले आणि त्यानंतर हिजबुल्लाह संघटनेच्या प्रमुखाची हत्या केल्यानंतर इराणने या युद्धात उडी घेतली आहे. मंगळवारी रात्री इराणने सुमारे १८० हून अधिक मिसाईल्स इस्त्रायलवर डागले. त्याला जर इस्त्रायलने प्रत्युत्तर दिले तर आणखी विनाशकारी हल्ला करण्याची धमकीही दिली आहे. त्यामुळे इराण आणि इस्त्रायलच्या युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
५ टक्क्यांनी दरवाढ : पश्चिम आशियातील या घटनेचा परिणाम हा आंतरराष्ट्रीय पातळीवर होणार असून मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. बुधवारी एकाच दिवसात कच्च्या तेलाच्या किमतीत ५ टक्क्यांची वाढ झाल्याने तसे संकेत मिळत आहेत. इराण हा कच्च्या तेलाचा जगातील एक प्रमुख निर्यातदार देश आहे. भारतामध्ये आयात करण्यात येणा-या कच्च्या तेलामध्ये इराणचा वाटा मोठा आहे.
इस्रायलने लेबनॉनची राजधानी बैरूतवर पुन्हा एकदा जोरदार मारा केला. त्यामुळे इस्रायल-लेबनॉन-इराण हा संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाही. याचा मोठा आर्थिक परिणाम जगाला भोगावा लागणार आहे. पेट्रोलियमचे दर ५ टक्क्यांहून अधिक कडाडले आहेत.