भाजप खासदाराचा खळबळजनक आरोप
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
वक्फ दुरुस्ती कायद्याबाबत देशभरातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. अशात आता भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांचे एक विधान समोरले आहे. त्यांनी जर सर्वोच्च न्यायालय कायदा करणार असेल तर संसद भवन बंद केले पाहिजे, असे म्हटले. याबाबत एक्सवर त्यांनी व्हीडीओ शेअर केले. यावेळी त्यांनी देशात होणा-या सर्व धार्मिक युद्धाला भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना जबाबदार आहेत, असा खळबळजनक आरोप केला.
देशात धार्मिक युद्धे भडकविण्यास सर्वोच्च न्यायालय जबाबदार आहे. सर्वोच्च न्यायालय आपल्या मर्यादेपलिकडे जात आहे. जर प्रत्येक गोष्टीसाठी सर्वोच्च न्यायालयात जावे लागत असेल तर संसद आणि विधानसभा बंद केली पाहिजे, असे ते म्हणाले. तुमची नियुक्ती करणा-यांनाच तुम्ही कसे निर्देश देऊ शकता, राष्ट्रपती भारताच्या सर्वोच्च न्यायाधीशांची नियुक्ती करतात. संसद या देशाचा कायदा बनवते. तुम्ही त्या संसदेला हुकूम देणार का, कोणत्या कायद्यात असे लिहिले आहे की, राष्ट्रपतींनी ३ महिन्यांत विधेयकावर निर्णय घ्यावा, याचा अर्थ असा की, तुम्ही या देशाला अराजकतेकडे घेऊन जाऊ इच्छिता, असा थेट आरोप सरन्यायाधीशांवर केला आहे. दुबे यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
या अगोदर उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनीही काही दिवसांपूर्वी न्यायव्यवस्थेविरुद्ध कडक टीका केली होती. ते म्हणाले की, आपण अशी परिस्थिती निर्माण करू शकत नाही, जिथे तुम्ही भारताच्या राष्ट्रपतींना सूचना देत आहात. या सूचना कोणत्या आधारावर देत आहात, संविधनाच्या कलम १४५ (३) अंतर्गत तुम्हाला फक्त कायद्याचा अर्थ लावण्याचा अधिकार आहे. कलम १४२ हे लोकशाही शक्तीविरुद्ध एक अण्वस्त्र क्षेपणास्त्र बनले आहे.