21.7 C
Latur
Thursday, February 6, 2025
Homeमहाराष्ट्रद्वारकानाथ संझगिरी यांचे निधन

द्वारकानाथ संझगिरी यांचे निधन

क्रिकेट समीक्षक हरपला

मुंबई : प्रतिनिधी
लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. संझगिरी यांनी मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पेशाने सिव्हिल इंजिनीयर असलेले संझगिरी मुंबई महापालिकेत उच्च पदावर कार्यरत होते. पण क्रिकेट आणि मराठी साहित्यातील रुचीने त्यांच्यातला क्रिकेट समीक्षक घडवला.

मराठी क्रिकेटरसिकांनी त्यांच्या लिखाणाला नेहमीच पसंतीची दाद दिली. संझगिरी यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी १२ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मान्यवरांनी शोक व्यक्त केला.

द्वारकानाथ संझगिरी यांनी एकाच वेळी दोन क्षेत्रांत काम केले. त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेत अभियंता म्हणून नोकरी केली. तेथून ते २००८ मध्ये मुख्य अभियंता, पाणीपुरवठा प्रकल्प म्हणून सेवानिवृत्त झाले. त्याचबरोबर त्यांनी स्तंभलेखक, लेखक आणि सूत्रसंचालक म्हणूनही आपली एक वेगळी ओळख बनवली.

१९७० च्या उत्तरार्धात लेखन कारकीर्द सुरू करून त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी ‘दिनांक’ आणि ‘श्री’ यासारख्या मासिकांमध्ये नियमित योगदान दिले. भारताने इंग्लंडमध्ये १९८३ चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर, त्यांनी इतर काही मित्रांसह एकच षटकार हे पाक्षिक क्रीडा मासिक सुरू केले. यात त्यांनी कार्यकारी संपादक म्हणून काम केले. संझगिरी यांनी १९८३ पासून ते आजपर्यंत सर्व एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्ल्ड कप कव्हर केले. स्तंभलेखनाव्यतिरिक्त संझगिरी यांनी प्रवास, सामाजिक समस्या, क्रीडा आणि चित्रपट अशा विविध विषयांवर ४० पुस्तके लिहिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR