मुंबई : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून करुणा शर्मा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. धनंजय मुंडे यांच्याकडे एकूण ११ मोबाईल क्रमांक आहेत. या मोबाईल क्रमांकाचा सीडीआर तपासला तर सरपंच संतोष देशमुख प्रकरणाचा संपूर्ण कच्चाचिठ्ठा समोर येईल, असा गौप्यस्फोट करुणा शर्मा यांनी केला आहे. शर्मा यांच्या खळबळजनक दाव्यानंतर आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, करुणा शर्मा यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अनेक अरोप केले आहेत. त्यानंतर आता आवादा कंपनीची बैठक धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी झाली होती. त्यामुळे याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करुणा शर्मा यांनी केली आहे. तसेच
मी माझ्या नव-याची किंवा स्वत:च्या मुलाचीही पाठराखण कधीच करणार नाही. धनंजय मुंडे हे दोषी आहेत, असे मी कधीही म्हणाले नाही. ते कदाचित दोषी ठरू शकतात. कारण त्यांच्या बंगल्यावरच आवादा कंपनीची बैठक झाली होती. तुम्ही याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करुणा शर्मा यांनी केली.
मोबाईल क्रमांकाचा सीडीआर काढावा
तसेच, धनंजय मुंडे यांचे एकूण ११ मोबाईल क्रमांक आहेत. हे सर्व मोबाईल क्रमांक माझ्याकडे आहेत. या मोबाईल क्रमांकाचा सीडीआर काढावा. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ते ११ नंबर हवे असतील तर मी त्यांना ते देऊ शकते, असेही करुणा शर्मा म्हणाल्या.
मुंडे यांच्या सर्व ११ नंबरची यादी देऊ शकते
‘‘देवेंद्र फडणवीस यांनी आजपर्यंत त्यांना भेटण्यासाठी मला वेळ दिलेली नाही. मी त्यांची भेट घेणार होते. मात्र मी त्यांच्याकडे कितीवेळा वेळ मागणार? देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी मला भेटण्यासाठी वेळ द्यायला हवा होता. मी धनंजय मुंडे यांच्या सर्व ११ नंबरची यादी देऊ शकते. २०२२ साली मी सीबीआयमध्येही या मोबाईल क्रमांकांची तक्रार दिली होती. या मोबाईल क्रमांकाचा सीडीआर काढा, अशी मी मागणी केली होती, अशी माहितीही त्यांनी दिली.