छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. अशातच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी धनंजय मुंडे यांच्यानंतर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा नंबर आहे, असा इशारा दिला आहे.
दरम्यान, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव समोर आल्यानंतर विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. तर १९९५ मधील एका प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाने दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. मात्र त्यानंतरही माणिकराव कोकाटे यांची विधिमंडळ सदस्यता कायम आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजणार हे सर्वश्रुत होते.
त्यानुसार, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर सोमवारी रात्रीच्या सुमारास संतोष देशमुख यांच्या मारहाणीचे फोटो समोर आले आणि आज (४ मार्च) धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. अशातच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी धनंजय मुंडे यांच्यानंतर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा नंबर आहे, असा इशारा दिला आहे.
संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी हत्या करण्यात आली होती. याप्रकरणाचे पडसाद राज्यात उमटल्यानंतर सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी सुरू करण्यात आली. त्यानंतर वाल्मिक कराडसह आठ आरोपींवर मकोकाअंतर्गत गुन्हा दाखल झाला. संतोष देशमुख यांना मारहाण केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असे आपण आजपर्यंत ऐकत आलो होतो. मात्र या प्रकरणात सीआयडीकडून दीड हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे. या दोषारोपपत्रातून संतोष देशमुख यांना मारहाण केल्याचे काही फोटो समोर आले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर ‘क्रूर’ हा शब्दही कमी पडेल, अशी मारहाण संतोष देशमुख यांना नासक्या प्रवृत्तीच्या आरोपींकडून करण्यात आली आहे. काळीज पिळटवून टाकणारे हे फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्र एकप्रकारे हळहळला आहे.