मुंबई : कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत केलेले आरोप कोर्टाने मान्य केले आहेत. तसेच करुणा शर्मा यांना प्रतिमहा दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश देखील दिले आहेत. दरम्यान या सर्व प्रकरणावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया देत करुणा मुंडे यांनी जी लढत दिली ती काबीले तारीफ आहे म्हणाल्या.
दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. करुणा मुंडे यांना दरमहा दोन लाख रुपये पोटगी देण्याचा आदेश वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने दिला आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या, करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्या केसमध्ये कोर्टाने दिलेला निर्णय अभिनंदन करण्यासारखा आहे. हा लढा फक्त महिलेच्या आर्थिक नुकसानीबाबतचा नाही तर तो महिलांच्या आत्मसन्मानाचा लढा आहे. ज्या संयमाने करुणा मुंडे यांनी ही लढत दिली ती काबीले तारीफ आहे. एकल लढा देणा-या महिलांसाठी हा संपूर्ण प्रवास हा प्रेरणादायी असल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या.
या सर्व प्रकाराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांना सर्व माहिती होती. असे असताना देखील धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात का सामावून घेण्यात आले, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.
मंत्रिपदाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार फडणवीस यांना असताना देखील त्यांनी का कानावरती हात ठेवले आहेत. हा कळीचा मुद्दा असून याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करणे आवश्यक असल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या.