छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात येणारी आवर्तने तसेच विसर्ग लक्षात घेता पावसाळ्याला आणखी अडीच महिने शिल्लक असल्याने पिके जगण्यासाठी शेतक-यांना झगडावे लागणार आहे.
दरम्यान, चैत्र महिन्याला सुरुवात झाली असून राज्यातील तापमानात प्रचंड वाढ होत आहे. आता धरणातील पाणीसाठा कमी होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा येत्या काही दिवसांत बसण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी याच सुमारास राज्यभरातील धरणसाठा ३८.३५ टक्क्यांवर होता. यंदा लघु, मध्यम, आणि मोठ्या धरणांमधील पाणीसाठा ४५.५६ टक्क्यांवर आला आहे. मागील वर्षीपेक्षा परिस्थिती दिलासादायक वाटत असली तरी लाखो नागरिकांची तहान भागवणारी काही धरणांमधील पाणी पातळी आता झपाट्याने घसरू लागली आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, साता-यातील कोयना धरण ४९ टक्क्यांवर गेले आहे. मराठवाड्यातील सर्वांत मोठे जायकवाडी धरण ५२.१८ टक्क्यांवर आहे. गेल्या वर्षी याच सुमारास शून्यावर गेलेले उजनी धरण २४ टक्क्यांवर पोहोचले आहे. एप्रिल मध्यापर्यंत उजनीचा साठा मायनसमध्ये जाण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. पुण्यातील भाटघर पानशेत धरण ४२ टक्क्यांवर आहे.
राज्यातील लघु, मध्यम व मोठ्या एकूण २९९७ धरणांमध्ये सध्या ४५.५६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाड्यात एकूण ९२० धरणांमध्ये ४४.९८ टक्के जलसाठा आहे. तर नाशिक व नगर विभागात ४७.१६ टक्के पाणी शिल्लक असल्याचे सांगण्यात आले. पुणे विभागात ४२.११ टक्के तर कोकण विभागात ५२.५५ टक्के पाणी शिल्लक आहे. नागपूर व अमरावती विभागात ४४.४२ टक्के व ५२.५९ टक्के अनुक्रमे पाणीसाठा आहे. उन्हाळी पिकांसह नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात येणारी आवर्तने तसेच विसर्ग लक्षात घेता पावसाळ्याला आणखी अडीच महिने शिल्लक असल्याने पिके जगवण्यासाठी शेतक-यांना झगडावे लागणार आहे.
हिंगोलीतील सिध्देश्वर, येलदरीत ६५ टक्के पाणी
हिंगोलीतील सिध्देश्वर, येलदरीत ६५ टक्के पाणी आहे. नांदेडच्या विष्णुपुरीचा साठा ४२ टक्क्यांवर गेला आहे. धाराशिवच्या सीना कोळेगाव धरणात २२ टक्के पाणी शिल्लक आहे. परभणीच्या निम्न दुधनामध्ये गेल्या वर्षी ७ टक्के पाणीसाठा होता. आता तो ४३.५४ टक्क्यांवर गेलाय. नाशिकच्या दारणा धरणात ४६ टक्के तर गंगापूर धरणात ६३ टक्के पाणी शिल्लक आहे. गिरणा धरणात ३२ टक्के पाणी असून कोल्हापूरच्या राधानगरीमध्ये ५७ टक्के पाणी आहे.