नांदेड : प्रतिनिधी
सत्ताधारी पक्षाची जातीयवादी भूमिका आहेच, ती पुन्हा एकदा त्यांनी समोर आणली आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. बेटेंगे तो कटेंगे या प्रचारावर पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुका येतात आणि जातात, पण धर्मा-धर्मात, जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम कुणी करू नये. पण भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना याचे भान नाही असेही शरद पवार म्हणाले. जातीयवादाकडे निवडणूक न्यावी यासाठीच योगी आदित्यनाथ यांना महाराष्ट्रात आणले जात आहे, असेही शरद पवार म्हणाले.
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत आम्हाला चिंतेचे कारणच नाही. महाविकास आघाडीच्या उमेदवाराची स्थिती चांगली आहे. इथले मतदार भाजपच्या विचारसरणीला अजिबात पाठिंबा देणार नाहीत, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी यावेळी दिली.
अशोक चव्हाण संधिसाधू
चव्हाण कुटुंबाला काँग्रेसने मुख्यमंत्रिपद दिले, देशाचे गृहमंत्रिपद, अर्थमंत्रिपद, संरक्षण मंत्रिपद दिले, स्वत: अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रिपद दिले. पक्षाने आणखी काय द्यायचे? लोक समजतात. आता त्यांना काय शिकवायचे ते शिकवतील, अशी प्रतिक्रिया देत शरद पवार यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. शंकरराव चव्हाण यांनी एकदा काँग्रेस सोडून दुसरा पक्ष काढला होता. पण त्याच्या नावात काँग्रेस हा शब्द होता, विचारधारा काँग्रेसची होती, पण अशोक चव्हाण एकदम विरोधातील विचारधारेसोबत गेले, हा संधिसाधूपणा आहे असेही शरद पवार म्हणाले.