अकोला : प्रतिनिधी
राजकारण्यांनो धर्मांचे भांडवल करू नका, असे म्हणत इंदुरीकर महाराज यांनी राजकारण्यांना खडे बोल सुनावले आहेत. इंदुरीकर महाराज हे महाराष्ट्रातले प्रसिद्ध कीर्तनकार आणि प्रवचनकार आहेत. त्यांच्या विविध वक्तव्यांमुळे ते कायमच चर्चेत असतात.
दरम्यान, निवृत्ती महाराज इंदुरीकर अकोल्यातील कीर्तनाच्या कार्यक्रमात म्हणाले की, तरुणांनो एक गोष्ट सांगतो तुम्ही या दंगलीबिंगलींमध्ये पडू नका. माझ्याइतकी कीर्तनं महाराष्ट्रात अजून कुणी केली नाहीत. मी अनुभवांवरून सांगतो आहे. मी ८० कीर्तनांच्या खाली महिना काढत नाही. माझी वाक्यं फक्त पुस्तकांतली नाहीत, तर अनुभवांमधून आलेली आहेत. आत्तापर्यंत लोकांकडे असलेल्या पेनांमध्ये कॅमेरे आहेत. जर दंगलीबिंगलीत दिसले तर दहा वर्षे शिक्षा आहे. आतापर्यंत गरिबांचीच लेकरे आत गेली आहेत. मोठ्यांची कधीही आत गेली नाहीत आणि जाणार नाहीत. हे मी तुम्हाला तळतळीने सांगतो आहे, असे इंदुरीकर महाराज म्हणाले.
धर्माचा अभिमान नाही का? असे कुणी तुम्हाला विचारेल त्याला सांगा तुमचा धर्म माईकवर आहे आमचा आमच्या हृदयात आहे. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी आमच्या धर्माचे भांडवल करू नका. धर्माच्या नावाखाली आमच्या गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका. सगळे पोलिस तुम्हाला सांगतील आज एकही काम पोलिस व्हेरीफिकेशनशिवाय होत नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे दंगलीत पडू नका, असे इंदुरीकर महाराज म्हणाले.