धारावी : प्रतिनिधी
धारावीतील पाच सेक्टर आणि ३४ झोनमध्ये सर्वेक्षणासाठी दररोज ५० हून अधिक टीम्स तैनात केल्या जातात. दिवसाला, सरासरी ३०० ते ४०० झोपड्यांची गणना करण्यात येत असून २०० ते २५० घरांची पडताळणी केली जात आहे. लोकसभा आणि विधानसभा, यासारख्या दोन निवडणुका आणि प्रदीर्घ पावसाळ्यासारखी मोठी आव्हाने असूनही, या वर्षी मार्चच्या मध्यापासून २५ हजारांहून अधिक झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले. आणि ६० हजारांहून अधिक झोपड्यांची गणना करण्यात आली.
राजकीय हस्तक्षेप आणि व्यक्तिगत स्वार्थ यासारख्या अडथळ्यांमुळे प्रगतीला विलंब होण्याची भीती वारंवार निर्माण होत असताना, धारावीकरांची सामूहिक इच्छाशक्ती या आव्हानांवर मात करू शकते. सर्वसाधारणपणे धारावीच्या रहिवाशांनी सर्व्हे करणा-या टीम्सना सहकार्य केले. परंतु आम्हाला आणखी सहकार्याची आणि अधिक सक्रिय दृष्टिकोन राखण्याची अपेक्षा आहे. सर्वेक्षण लवकर पूर्ण झाल्यास परिवर्तनाच्या प्रवासाची सुरुवात होईल, असेही या सूत्रांनी नमूद केले.
झोपडपट्टी पुनर्विकास योजनांपेक्षा वेगळेपण म्हणजे, रहिवाशांना पुनर्वसन झालेल्या इमारतींसाठी परिचालन आणि देखभाल १० वर्षे मोफत असेल आणि १० टक्के अतिरिक्त व्यावसायिक क्षेत्रे मिळतील जी सोसायटी भाडेतत्त्वावर देऊन त्या माध्यमातून त्यांचे परिचालन व देखभाल आजीवन मोफत करू शकतील.
आशियातील सर्वात मोठ्या या झोपडपट्टीच्या सर्व्हेच्या उपक्रमाला गती देण्यासाठी अतिरिक्त टीम्स तैनात केल्या जाणार आहेत. धारावीकरांना खासगी स्वयंपाकघर, शौचालये, अखंड पाणी आणि वीज व आरोग्यदायी, हिरवेगार वातावरण प्रदान करणे हे या पुनर्विकास प्रकल्पाचे ध्येय आहे. मोठे रस्ते, मोकळ्या जागा, आधुनिक आरोग्य सुविधा आणि उत्तम पायाभूत सुविधा हे सर्व या प्रकल्पाचा भाग आहेत.