मुंबई : प्रतिनिधी
राज्यात शुक्रवारी (१५ मार्च) धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पण, या सणाला गालबोट लागल्याचेही समोर आले आहे. एकीकडे बदलापूरमध्ये धुळवडीवेळी लागलेला रानड उतरवण्यासाठी गेलेल्या ४ जणांचा बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले. तर, दुसरीकडे यवतमाळमध्ये धरणामध्ये पोहण्यासाठी उतरलेल्या दोन मावस भावांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये शोककळा पसरली आहे.
दरम्यान, शुक्रवारी दुपारी बदलापूरच्या सीमेवर असलेल्या पोद्दार गृह संकुलामधील ७ ते ८ मुले धुलीवंदन साजरा केल्यानंतर उल्हास नदीमध्ये अंघोळीसाठी गेली होते. या भागात नदीपात्राला खोली असून पाण्याचा अंदाज न आल्याने १४ वर्षीय आर्यन मेदर नावाचा मुलगा बुडू लागला होता. त्याचा जीव वाचवण्यासाठी गेलेले १५ वर्षीय आर्यन सिंग, १६ वर्षीय सिद्धार्थ सिंग आणि १५ वर्षीय ओमसिंग तोमर हेदेखील अंदाज न आल्याने या नदीपात्रात बुडाले. या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
यवतमाळमधील डोंगरखर्डा येथून जवळ असलेल्या खोरद येथील धरणावर धुळवड साजरी करून ८ जण पोहण्यासाठी गेले होते. त्यापैकी ५ जण अचानक बुडू लागल्याने एकच गोंधळ उडाला. यामधील तिघांना वाचविण्यात यश आले, तर दोन मावस भावांचा मृत्यू झाला. यामध्ये एकाचा मृत्यू मृतदेह बाहेर काढण्यात आला असून दुस-याचा शोध अद्याप सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय पंकज अशोकराव झाडे आणि २८ वर्षीय जयंत पंढरी धानफुले अशी मृतांची नावे आहेत. ते दोघेही अरुण भोयर यांच्या घरी पाहुणे म्हणून आलेले होते. धुळवड झाल्यानंतर अंघोळ करण्यासाठी म्हणून अरुण भोयर, पंकज झाडे, जयंत धानफुले आणि इतर ५ जण धरणामध्ये गेले. पण, यातील ५ जण अचानक बुडू लागले. यावेळी, तिथे असलेल्या बोटीच्या सहाय्याने काही जणांना वाचवले.