25.1 C
Latur
Wednesday, May 28, 2025
Homeमहाराष्ट्रधुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरने ७ तरुणांना चिरडले; ६ ठार

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरने ७ तरुणांना चिरडले; ६ ठार

गेवराई : प्रतिनिधी
महामार्गाच्या दुभाजकात अडकलेली गाडी काढत असताना भरधाव कंटेनरने सात तरुणांना चिरडल्याने मोठा अपघात झाला आहे. या दुर्घटनेत गेवराई शहरातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला. हा भीषण अपघात गेवराई शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या गढीच्या उड्डाणपुलावर सोमवारी मध्यरात्री उशिरा घडला. या अपघातामुळे गेवराईत सर्वत्र शोककळा पसरली आहे.

दरम्यान, गढीच्या उड्डाणपुलावर अपघात घडल्याची माहिती मिळतात घटनास्थळी अनेकांनी धाव घेतली होती. मात्र सहा तरुण जागीच मृत्युमुखी पडल्याने त्यांना मदतकार्य करता आले नाही. यानंतर सहा जणांचे मृतदेह रुग्णवाहिकेतून शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. यानंतर याठिकाणी शहरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी सर्वचजण या दुर्दैवी घटनेविषयी हळहळ व्यक्त करत होते.

मृतांची नावे
बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दीपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन ननवरे यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. एका गंभीर जखमी व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सहा जणांच्या अपघाती निधनाने गेवराईवर शोककळा पसरली आहे.

कसा झाला अपघात
वास्तविक रविवारी रात्री मध्यरात्री धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर गढी येथील कारखान्यासमोर बाळासाहेब आतकरे यांची कार डिव्हायडरवर आदळून किरकोळ अपघात झाला होता. या अपघातात कुणीही जखमी झाले नव्हते. मात्र, डिव्हायडरमध्ये अडकलेली ही गाडी बाहेर काढण्यासाठी बाळासाहेब आतकरे आणि त्यांचे काही सहकारी सोमवारी रात्री उशिरा घटनास्थळी आले होते. यानंतर दुभाजकात अडकलेली गाडी काढत असतानाच अचानक भरधाव वेगात आलेल्या आयशर ट्रकने त्यांना जबर धडक दिली. या भीषण धडकेत बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दीपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन ननवरे यांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गेवराई तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बीडमध्ये अपघाताची दुसरी घटना
बीडच्या आष्टी येथे मुकादमासह दोघे जीपमधून गावाकडे जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने जीप झाडावर आदळली. यात दोघांचा जागीच, तर अन्य एकाचा दुस-या दिवशी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अकोले बुद्रुक येथील तानाजी संभाजी माने हे ऊसतोड मुकादम म्हणून काम करत होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील काही मजूर त्यांच्याकडे काम करतात. या अपघातात संतोष साहेबराव नवले, बापू राजेंद्र जाधव या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर जीपचालक, मुकादम तानाजी संभाजी माने हे गंभीर जखमी झाले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR