सोलापूर : प्रतिनिधी
परभणीतील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याच्या घटनेचे सर्वत्र पडसाद उमटले. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाच्या विरोधात आंबेडकरी अनुयायांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंददरम्यान आंदोलकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. यावेळी आंदोलकांनी दुकाने देखील बंद केली. तसेच आज धुळ्यात १० ते १२ जणांनी एसटी बसवरही दगडफेक केली. त्यानंतर आता सोलापुरात एसटी बसवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे.
धुळ्यात दसरा मैदान स्टॉपजवळ नाशिकहून शहाद्याकडे जाणा-या बसवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना आज सोमवारी दुपारी घडली. या दगडफेकीनंतर प्रवाशांमध्ये एकच भीती पसरली होती. तर काही प्रवासी किरकोळ जखमी झाले होते. धुळ्यानंतर सोलापुरात एसटी बसवर दगडफेकीची घटना घडली. सोलापुरातही अज्ञात व्यतींनी ३ एसटी बसवर दगडफेक केली.
सोलापुरातील डी मार्ट आणि सम्राट चौक परिसरात एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. सोलापूरहून तुळापूरला जाणा-या दोन गाड्या आणि सोलापूरहून साता-याला जाणा-या एक गाडीवर दगडफेक झाली. दगडफेकीनंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. ही दगडफेक नेमकी कुणी केली, याचा तपास पोलिस करत आहेत. या प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. यामध्ये कोणत्याही प्रवाशाला त्रास झालेला नाही. सर्व परिस्थिती पूर्ववत झाली असून, वाहतूक सुरळीत सुरु झाली आहे.
एसटी डेपोतील शिवशाही बस अज्ञात व्यक्तीकडून पेटविण्यात आली आहे. यासह तीन बसच्या काचा फोडण्यात आल्या. परभणी येथील पोलिस कोठडीतील सोमनाथ सुर्यवंशी मृत्यूप्रकरणामुळे सोलापूरात पडसाद उमटले. बसवर दगड फेक आणि आंदोलन करण्यात आले. सोलापूरात बंदच्या हाकेला संमिश्र प्रतिसाद मिळाला