भाजपच्या सत्ताकाळात काय होऊ शकत नाही? होत्याचे नव्हते होऊ शकते, जे आपण अनुभवतो आहोत. भाजपने मनात आणले तर इकडची दुनिया तिकडे होऊ शकते. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान ते जवळपास झालेच होते. परंतु ऐनवेळी ट्रम्प नामक माशी शिंकली. इतिहास घडता घडता राहिला. भाजप सरकारने एक नामी संधी वाया घातली. ‘मोदी है तो मुमकीन है, नामुमकीन भी मुमकीन है’! हे विसरून चालणार नाही. भाजपच्या मनमंदिरात अनेक सुप्त इच्छा तेवत असतात. त्या अधूनमधून हळूच डोके वर काढत असतात. त्याचे प्रत्यंतर नुकतेच आले. सीमा कधीही बदलू शकतात, सिंध पुन्हा भारताचा भाग होऊ शकतो, असे विधान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. ‘सिंध उद्या पुन्हा भारताचा भाग होऊ शकतो’ या राजनाथ सिंह यांच्या विधानाने पाकिस्तानमध्ये खळबळ उडवून दिली आहे. संस्कृतीनुसार सिंध नेहमीच भारताचा भाग राहिला आहे. आज सिंध भारताचा भाग नसला तरी संस्कृतीनुसार सिंध नेहमीच भारताचा भाग राहील. जमिनीचा प्रश्न आहे, कधी काय होईल ते सांगता येत नाही, असे संरक्षणमंत्री म्हणाले.
२३ नोव्हेंबर २०२५ रोजी दिल्लीत एका सिंधी परिषदेला संबोधित करताना राजनाथ सिंह यांनी ही टिप्पणी केली. सिंह यांनी लालकृष्ण अडवाणी यांचा उल्लेख करताना म्हटले की, त्यांनी त्यांच्या एका पुस्तकात लिहिले आहे की, सिंधी हिंदू, विशेषत: त्यांच्या पिढीतील लोक अजूनही सिंधला भारतापासून वेगळे मानत नाहीत. केवळ सिंधमध्येच नाही तर संपूर्ण भारतात हिंदू सिंधू नदीला पवित्र मानत होते. सिंधमधील अनेक मुस्लिमांचा असा विश्वास होता की, सिंधू नदीचे पाणी मक्केच्या झमझमच्या पाण्यापेक्षा कमी पवित्र नाही. हे अडवाणी यांचे विधान आहे. आज सिंधची भूमी भारताचा भाग नाही, परंतु संस्कृतीच्या दृष्टिकोनातून, सिंध नेहमीच भारताचा भाग राहील. जमिनीच्या बाबतीत सीमा बदलू शकतात. काय सांगावे, उद्या सिंध भारतात परत येऊ शकेल. सिंधू नदीला पवित्र मानणारे सिंधचे लोक नेहमीच आपले राहतील, ते कुठेही असले तरी ते नेहमीच आपले राहतील. १९४७ च्या फाळणीनंतर सिंध प्रदेश पाकिस्तानला देण्यात आला. तिथे राहणारे बहुतेक सिंधी हिंदू भारतात स्थलांतरित झाले आहेत. आज सिंध भौगोलिकदृष्ट्या भारताचा भाग नसला तरी सभ्यता आणि संस्कृतीच्या बाबतीत तो नेहमीच भारताचा भाग राहील.
पाकव्याप्त काश्मीर (पीओके)बाबत संरक्षणमंत्री म्हणाले, भारत कोणत्याही आक्रमक कारवाईशिवाय पाकव्याप्त काश्मीर मिळवेल. तेथील लोक स्वत:हून आवाज उठवू लागले आहेत. ते स्वातंत्र्याची मागणी करत आहेत. दिल्लीतील विज्ञान भवन येथे वर्ल्ड सिंधी हिंदू फाऊंडेशनद्वारा आयोजित ‘स्ट्राँग सोसायटी-स्ट्राँग इंडिया’ कार्यक्रमात बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, फाळणीनंतर सिंधू नदीजवळील सिंध प्रांत पाकिस्तानात गेला आणि त्या प्रदेशात राहणारे सिंधी लोक भारतात आले. या सिंध प्रांताचे भारतापासून वेगळे होणे हे लालकृष्ण अडवाणींसारख्या नेत्यांच्या पिढीने कधीही स्वीकारले नाही. फाळणीनंतर भारतातील सिंधी समुदायाची सुरुवात शून्यातून झाली. मात्र त्यांनी आता नवी उंची गाठली आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यात सिंधी समुदायाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानच्या सिंध प्रांताबाबत केलेल्या वक्तव्यानंतर पाकिस्तानात तीव्र प्रतिक्रिया उमटली. पाकच्या विदेश मंत्रालयाने अधिकृत निवेदन जारी करून या टिप्पणीची निंदा केली. निवेदनात म्हटले आहे की, राजनाथ सिंह यांचे वक्तव्य आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे.
त्यातून हिंदू धर्माच्या विस्तारवादी विचारसरणीचे दर्शन होते. भारत सरकारने आपल्या नागरिकांच्या विशेषत: अल्पसंख्याक समुदायाच्या सुरक्षेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. पाकिस्तानने असा आरोप केला की, भारतात अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसा भडकविणा-यांना जबाबदार धरण्यात येत नाही. भारताने ईशान्येकडील त्या लोकांच्या समस्या सोडवायला हव्यात, जे पद्धतशीर भेदभाव, उपेक्षा आणि ओळख- आधारित हिंसेचा सामना करत आहेत. या विवादात पाकने काश्मीर मुद्दाही जोडला. मंत्रालयाने म्हटले की, भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावानुसार काश्मीर विवादाच्या समाधानासाठी पावले उचलली पाहिजेत. पाक आंतरराष्ट्रीय नियमांच्या आधारे भारताशी असलेले वाद शांततापूर्ण मार्गाने सोडवण्यास तयार आहे, पण आपल्या सुरक्षा आणि स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी पूर्णपणे सज्ज आहे. राजनाथ सिंह यांचे विधान भ्रामक आणि धोकादायक पद्धतीने बदल करण्याच्या बाजूचे असल्याचे म्हटले आहे. १९४७ मध्ये फाळणीनंतर सिंध प्रांत पाकिस्तानचा भाग बनला. हा पाकिस्तानचा तिसरा सर्वांत मोठा प्रांत आहे. राजधानी कराची आहे. या प्रांतात उर्दू, सिंधी आणि इंग्रजी भाषा बोलल्या जातात.
राजनाथ सिंह यांनी सिंधबाबत केलेल्या विधानामुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला असून त्यांनी पुन्हा एकदा भारताविरुद्ध गरळ ओकण्यास प्रारंभ केला आहे. २०व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत सिंधच्या अर्थव्यवस्थेत आणि प्रशासनात हिंदूंची महत्त्वपूर्ण भूमिका होती. फाळणीपूर्वी सिंधमधील हिंदू लोकसंख्या मध्यम आणि उच्च वर्गात वर्गीकृत होती. हे लोक कराची आणि हैदराबादसारख्या सिंधच्या शहरी भागात राहत होते. हे हिंदू केवळ कुशल नव्हते तर त्यांना व्यवसायाची सखोल समज होती. फाळणीच्या वेळी सुमारे ८ लाख हिंदूंना सिंध सोडण्यास भाग पाडण्यात आले. भारतातून सिंधमध्ये स्थलांतरित झालेल्यांकडे आवश्यक कौशल्याचा अभाव होता. भारतातील सिंधी समुदाय समृद्ध आहे आणि त्यांचे मोठे व्यवसाय आहेत. याउलट पाकिस्तानमधील सिंधी गरीब आहेत. भारतातून गेलेल्या मुस्लिमांचे सिंधी मुस्लिमांनी चांगले स्वागत केले नाही. पाकमधील सिंधींनी भारतीय मुस्लिमांना ‘मुहाजिर’म्हणायला सुरुवात केली. परिणामी सिंधी आणि मुहाजिरांमध्ये हिंसाचार सुरू झाला. असो. आता संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

