39.2 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeलातूरनदी जोड प्रकल्पासाठी थेट राष्ट्रपतींना साकडे!

नदी जोड प्रकल्पासाठी थेट राष्ट्रपतींना साकडे!

लातूर : प्रतिनिधी
देशाची सद्यस्थिती पाहता देशाच्या काही भागात नद्यांना बारा महिने पाणी असल्याने पूर परिस्थिती तर देशाच्या दुस-या बाजूला सातत्याने कोरडा दुष्काळ पडतो आहे. देशात पाण्याचा असमतोल असल्याने अनेक समस्या उद्भवत आहेत. देशात पाण्याचा समतोल राखण्यासाठी आणि पूर भागातील पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळविण्यासाठी नदीजोड प्रकल्प कार्यान्वित होणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. या मागणीसाठी वसुंधरा प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था २०१६ पासून लढा देत आहे. दरम्यान, वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने नदीजोड प्रकल्प कार्यान्वित व्हावा, यासाठी स्वाक्षरी अभियान राबविले. या जमा नागरिकांच्या स्वाक्षरींचे निवेदन मंगळवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे स्पीड पोस्टद्वारे पाठविण्यात आले.
नदीजोड प्रकल्प कार्यान्वित व्हावा, अशी संकल्पना सर्वप्रथम महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४२ ते १९४५ या काळात मांडली होती. देशात सद्यस्थिती पाहता काही भागात अतिवृष्टी तर काही भागात सातत्याने कोरडा दुष्काळ पडतो आहे. पूर परिस्थिती आणि दुष्काळ परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शासनाच्या वतीने कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जातो. देशात पाण्याचा असमतोल असल्याने अनेक समस्या उद्भवत आहेत. पाणी नसल्याने शेतकरी बांधवांना आत्महत्या करण्याची वेळ येत आहे. शिवाय, पाणी नसल्याने त्या भागात रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. देशात एकीकडे पूर परिस्थिती तर दुसरीकडे सातत्याने पडणारा कोरडा दुष्काळ यामुळे देशातील नद्यांना एकत्र जोडल्यास पूर भागातील पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळविणे शक्य होणार आहे.
नदीजोड प्रकल्प हा अत्यंत महत्त्वाचा आणि महत्वकांक्षी प्रकल्प असून हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास देशातील अनेक समस्या मिटू शकतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कल्पनेतील नदीजोड प्रकल्प ही आजची काळाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. दरम्यान मधल्या काळात तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांनी देखील नदीजोड प्रकल्पासाठी पावले उचलली होती. मात्र, हा प्रकल्प दिवसेंदिवस रखडत चाललेला आहे. हा प्रकल्प सुरु व्हावा, यासाठी लातूरच्या वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने २०१६ पासून सातत्याने लढा दिला जातो आहे. वसुंधरा प्रतिष्ठानने या मागणीसाठी नागरिकांच्या स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करुन एकूण ३ हजार ९८ स्वाक्षरी जमा केल्या. या जमा स्वाक्षरींचे निवेदन देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे डाक पोस्टद्वारे पाठविण्यात आल्या. यावेळी वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. योगेश शर्मा उपाध्यक्ष रामेश्वर बावळे, कार्यकारिणी अध्यक्ष अ‍ॅड. डॉ. अजित चिखलीकर, वृक्ष लागवड अभियान प्रमुख राहुल माशाळकर, लातूर शहारध्यक्ष उमेशआप्पा ब्याकोडे, वुमन्स विंगच्या अध्यक्षा प्रिया मस्के, सदस्या मोहिनी चांदोरीकर, योगेश महाराज चांदोरीकर आदींची उपस्थिती होती.
फोटो: ८

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR