16 C
Latur
Friday, December 13, 2024
Homeमहाराष्ट्रनद्या जोड प्रकल्प, ग्रीन एनर्जीवर भर : फडणवीस

नद्या जोड प्रकल्प, ग्रीन एनर्जीवर भर : फडणवीस

५ वर्षांचा अ‍ॅक्शन प्लॅन, महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार 
मुंबई : प्रतिनिधी
देवेंद्र फडणवीस तिस-यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. यानंतर त्यांनी शुक्रवार, दि. ६ डिसेंबर २०२४ रोजी डीडी सह्याद्रीला दिलेल्या मुलाखतीत महायुती सरकारचा पुढील ५ वर्षांचा विकास प्लॅन सांगितला. आता नव्या कार्यकाळात आम्ही प्रकल्पांना वेगाने पुढे नेणार आहोत. यावेळी माझा भर नदीजोड प्रकल्पावर असणार आहे. मी ४ नदीजोड प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यामुळे महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार आहे. यासोबतच आता ग्रीन एनर्जीवरही भर असणार आहे, जेणेकरून विजेची मागणी पूर्ण होण्यास मदत मिळेल, असे फडणवीस म्हणाले.

या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती सरकारच्या प्राधान्यक्रमावर भाष्य केले. आता महाराष्ट्र थांबणार नाही याचा अर्थ अडीच वर्षापूर्वी आमचे सरकार आले, तेव्हा आम्ही राज्याला ट्रॅकवर आणले. आता सरकारच्या पुढच्या काळात चार नदीजोड प्रकल्पांवर माझा भर असणार आहे. यामुळे महाराष्ट्र कायम दुष्काळमुक्त होईल. तसेच ग्रीन एनर्जीवरदेखील माझा भर राहणार आहे. आपण ५४ हजार मेगावॅटचे वेगवेगळे प्रकल्प हातात घेतले आहेत. २०३० मध्ये ५२ टक्के वीज ग्रीन एनर्जीसारख्या पारंपरिक स्त्रोतातून असणार आहे, असेही फडणवीस म्हणाले. यामुळे शेती आणि उद्योग क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे. दोन्ही क्षेत्रांमुळे महाराष्ट्रात रोजगाराची निर्मिती होईल आणि अर्थव्यवस्थेला विशेष चालना मिळेल, असे ते म्हणाले.

या मुलाखतीत फडणवीस यांनी जनतेचेही आभार मानले. ते म्हणाले, कालच्या शपथविधीतील जनसमुदाय पाहिल्यानंतर खूप आनंद झाला. जे यश जनतेने दिले, ते सेलिब्रेशन करण्याकरिता नाही. ते जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याकरिता दिले आहे. मला खूप मोठ्या जबाबदारीची जाणीव झाली, असेही ते म्हणाले.

मुंबईत वाहतूक सेवा सुरळीत
मी २०१६ मध्ये मुंबईच्या एमएमआर रिजनमधील कोणत्याही भागात एक तासात जाता आले पाहिजे, अशी घोषणा केली होती. पण आम्ही त्याच्यापुढे जात आहोत. कोस्टल रोड झाला, वर्सोवा सी-लिंकचेही काम झाले, वर्सोवा-मढचे टेंडर दिले आहे, त्याचे काम सुरू होत आहे. मढपासून विरारपर्यंत सी-लिंक तयार केले. जपान सरकारने प्रकल्पाला ४० हजार कोटी देण्याचे कबूल केले. त्यामुळे मुंबईत वाहतुकीचा वेळ कमी होणार आहे, असे फडणवीस म्हणाले.

३७५ कि.मी.चे मेट्रो नेटवर्क
३७५ किलोमीटरचे मेट्रो नेटवर्क करणार आहोत. पाच वर्षात हे ३७५ किमी मेट्रोचे काम सुरू केले आहे, यामुळे मुंबईकरांच्या वेळेची बचत होईल आणि त्यांना क्वालिटी टाईमही मिळेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR