22.3 C
Latur
Saturday, February 22, 2025
Homeसंपादकीयनव्या आशा, अपेक्षा, संकल्पना!

नव्या आशा, अपेक्षा, संकल्पना!

बघता बघता एकविसाव्या शतकातील २३ वर्षे इतिहासजमा झाली आणि २४ व्या वर्षाचे हर्षोल्हासाने आपण स्वागत करीत आहोत. बाय बाय २०२३ असा निरोप देत असतानाच हॅपी न्यू इअर असे म्हणत असताना मोठ्या आशा, अपेक्षांनी आपण २०२४ कडे बघत आहोत. सरत्या सालातील कटू स्मृती पुसून टाकत ‘तम निशेचा सरला’ असे म्हणताना नव्या सालात काय वाढून ठेवलेय याचाही कानोसा घेत आहोत. मावळणारा प्रत्येक दिवस नव्या दिवसासमोर काय ठेवणार आहे याचा अंदाज आला की भविष्यातील प्रत्येक क्षण आशादायक वाटू लागतो. मग नव्या संकल्पनांचा निर्धार केला जातो, सरत्या वर्षात हे राहिले ते नव्या वर्षात करू, अशी खूणगाठ बांधली जाते. त्यामुळेच नव्या वर्षाचे स्वागत करणे म्हणजे केवळ भिंतीवरचे कॅलेंडर बदलून नव्या वर्षाचे कॅलेंडर लटकावणे नव्हे तर नव्या आशा-आकांक्षांनी नव्या वर्षाकडे पाहणे होय. सरत्या वर्षाचा अखेरचा दिवस मावळणार या विचाराने जशी मनाला हुरहूर लागते तसे नव्या दिवसाच्या स्वागताचे वेधही लागतात. सरत्या वर्षाचा अखेरचा दिवस त्या वर्षातील अन्य दिवसासारखाच असतो. नेहमीप्रमाणेच सकाळी सूर्य उगवतो आणि संध्याकाळी अस्ताला जातो.

माणूस काहीसा निवांत होतो आणि नव्या दिवसाला सामोरे जाण्याची ऊर्जा प्राप्त करताना मावळत्या दिवसाने आपल्याला काय दिले, आपण काय कमावले किंवा काय गमावले याचा लेखाजोखा मांडून नवे संकल्प रचतो. अलीकडे जगाची वाटचाल खूप वेगाने सुरू आहे. मोबाईल आणि इंटरनेटमुळे ‘दुनिया मेरी मुठ्ठी में’ असा आपला समज झाला आहे. खरंच तसे झाले का याचा खोलवर जाऊन आपण विचार केला पाहिजे. आपल्या मनाचा वेग इंटरनेटपेक्षाही अधिक आहे. काळासोबत चालताना मागे पडणा-या प्रत्येक क्षणाची साठवण मन करीत असते. आठवणींची साठवण इतरांसोबत वाटून घेतल्याने मन मोकळे होते. असे केल्याने मनाच्या कप्प्यातील जागा नव्या आठवणी साठविण्यासाठी मोकळी होते. म्हणूनच सरत्या वर्षाचा मागोवा घेण्याची आणि नव्या वर्षाकरिता स्वप्नांची बांधणी करण्याची प्रथा जगभर पडली असावी. सरत्या वर्षातील आठवणींचा लेखाजोखा मांडणे उत्साहवर्धक असले की नव्या वर्षाच्या प्रत्येक दिवसाचा आनंद उपभोगण्याची ऊर्जा मनात साठत जाते. भूतकाळाकडे जाणारा प्रत्येक क्षण हा भविष्यासोबत समोर येणारा प्रत्येक नवा क्षण जगण्याची ऊर्जा देत असतो. प्रत्येक नवा क्षण फक्त आनंदाचा गुलदस्ता हाती घेऊनच आपल्यासमोर येतो असे नाही,

कधी एखाद्या क्षणाला दु:खाची किनारदेखील असते पण दु:ख कुरवाळायला अश्रूंना वेळदेखील मिळू नये अशा वेगाने सुखाचे क्षण समोर येऊन उभे राहतात आणि नव्या क्षणाला सामोरे जाण्याची नवी उमेद भविष्यातील अपेक्षांच्या कक्षा रुंदावत राहतात. सरत्या सालास निरोप देताना आणि नव्या वर्षाचे स्वागत करताना प्रत्येकाच्या मनात अनेक आशा-अपेक्षा आहेत. सर्वसाधारणपणे बदलते वर्ष हा एक मैलाचा दगड आहे. प्रत्येकाच्या आयुष्यातील एक वर्ष कमी होते आणि ज्या ध्येयाने जीवनप्रवास सुरू आहे त्या दिशेने अधिक कणखरपणे पावले टाकण्याचे काम सुरू होते. नवे वर्ष देशासाठी अनेक अर्थांनी वेगळे ठरू शकते. भारत हा जगातील सर्वांत मोठा लोकशाहीप्रधान देश आहे. भारताची सर्वाधिक लोकसंख्या ही जगासाठी केवळ बाजारपेठ राहिलेली नाही तर अनेक नव्या गोष्टी प्रत्यक्षात आणण्याचे योग्य ठिकाण म्हणूनही भारताकडे पाहिले जात आहे. भारताची लोकशाहीवादी देश ही ओळख टिकून राहण्याचे मुख्य कारण म्हणजे इथे होणा-या निवडणुका.

जगात जेवढे लोकशाहीवादी देश आहेत त्या सर्वांमध्ये भारतात होणारी लोकसभा निवडणूक ही अनेक अर्थांनी वेगळ्या स्वरूपाची ठरते. काही कोटी लोक या मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेतात आणि आपला मतदानाचा हक्क बजावतात. हा सारा प्रयोग यशस्वी करण्यासाठी सुमारे महिनाभर कोट्यवधी कर्मचा-यांचा प्रत्यक्ष सहभाग असतो. यासाठी होणारा खर्च सुमारे २० हजार कोटींचा असतो. हा केवळ मतदान प्रक्रियेशी संबंधित खर्च असतो. २०२४ हे वर्ष निवडणूक वर्ष आहे, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही. हा सगळा प्रयोग यशस्वीपणे पूर्ण करणे हे देशभरातील सरकारी यंत्रणांपुढचे आव्हान आहे. संविधानाने आखून दिलेल्या पद्धतीने ही सगळी लोकशाही प्रक्रिया पूर्ण केली जाते. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर होणा-या २०२४ च्या निवडणुका म्हणजे लोकशाही व्यवस्थेला भक्कम करणारा मोठा प्रयत्न ठरेल. काळ नेहमीच आपापल्या पद्धतीने पुढे सरकतो. म्हणूनच म्हटले जाते की, कॅलेंडर किंवा त्यानुसार आखले जाणारे वेळापत्रक म्हणजे काळाचे बोट धरून पुढे सरकण्याचा प्रयत्न असतो. कॅलेंडरवरचे बदलणारे महिने हे जरी एखादे पान बदलण्यासारखे असले तरी त्यातून काळ बदलण्याची शक्यता नसते. काळ बदलला हा अनुभव घ्यायचा असेल तर प्रत्येकालाच स्वत:मध्ये बदल घडवून आणावा लागेल.

सरत्या सालात भूकंप, पूर, अशा नैसर्गिक आपत्तींमुळे जगातील काही भागांना मोठा फटका बसला. संकटे निसर्गनिर्मित असली तरी ती लक्षात घेऊन त्यांना तोंड देण्याची सिद्धता ठेवली तर कमीत कमी जीवित वा वित्तहानी होऊ शकते. रशिया-युके्रन युद्ध समाप्त होण्याची चिन्हे दिसत नसताना ‘हमास’ या दहशतवादी संघटनेने इस्त्रायलवर केलेल्या हल्ल्याने मध्यपूर्वेत युद्धाला तोंड फुटले. या दोन्ही युद्धांचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. भारताचा विचार केल्यास राजकीय, सामाजिक, क्रीडा, लोकसंख्या, आरोग्य, विज्ञान आदी अनेक क्षेत्रांत अनेक चांगल्या घडामोडी घडल्या. हे सारे होत असताना मूलत: माणूस कुठे आहे याचा विचार करायला हवा. माणसाकडे साधनांची रेलचेल असताना त्याला नेमके सुख सापडले आहे काय अथवा ते हुलकावणी देत आहे काय याचाही विचार व्हायला हवा. खरं सुख शांती, पे्रम , जिव्हाळा, आपुलकी, सुहृदयता यात असून शांत पुरेशी झोप लागणे हेच सर्वांत मोठे सुखी माणसाचे लक्षण आहे, असा सुखी माणसाचा सदरा मिळविण्यासाठी माणसाचा जीवनप्रवास सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR