पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सुपुत्राला संधी?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी बुधवारी केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे न्यायमूर्ती बी. आर. गवई यांची पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. १० नोव्हेंबर रोजी निवृत्त झालेले माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या जागी न्या. खन्ना यांची ११ नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. आता बी. आर. गवई यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे भारताच्या सरन्यायाधीशपदी पुन्हा एकदा महाराष्ट्राचे सुपुत्र असणार आहेत.
सरन्यायाधीश खन्ना हे सहा महिन्यांच्या अल्प कालावधीनंतर १३ मे २०२५ रोजी निवृत्त होत आहेत. परंपरेनुसार विद्यमान सरन्यायाधीश त्यांचा उत्तराधिकारी म्हणून सर्वांत वरिष्ठ न्यायाधीशांची शिफारस करतात. यापूर्वी कायदा मंत्रालयाने सरन्यायाधीश खन्ना यांना त्यांच्या उत्तराधिका-यांची निवड करण्याची औपचारिक विनंती केली होती. त्यामुळे नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली. खन्ना यांच्या शिफारसीनुसार न्या. गवई यांची नियुक्ती झाल्यास ते भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. १४ मे रोजी हा शपथविधी होऊ शकतो. न्या. गवई नोव्हेंबर २०२५ मध्ये निवृत्त होणार असल्याने फक्त ६ महिनेच भारताचे सरन्यायाधीश म्हणून काम पाहतील.