मुंबई : प्रतिनिधी
नागपुरात झालेल्या हिंसाचाराचे पडसाद हे आज विधिमंडळात पाहायला मिळाले. नागपुरातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आज विरोधकांनी आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पाय-यांवर घोषणाबाजी केली.
नागपूर दंगल प्रकरणात विरोधक अधिकच आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षाने विधानसभा पाय-यांवर आंदोलन करत द्वेष पसरवणा-या मंत्र्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. दंगल नको शांतता हवी, शांतताप्रिय महाराष्ट्र हवा, दंगलमुक्त महाराष्ट्र हवा अशी मागणी केली आहे.
दंगल खपवून घेणार नाही : फुके
तर दुसरीकडे महाराष्ट्राची मान खाली जाईल अशी कुठलीही घटना खपवून घेणार नाही, अशी ताकीद भारतीय जनता पक्षाचे आमदार परिणय फुके यांनी केली आहे. महाराष्ट्र औरंगजेबाविषयी स्तुती करणारे कुठलेही शब्द खपवून घेणार नाही. जो कोणी असे कृत्य करतो त्याला सोडले जाणार नाही. लाईन ऑर्डर खराब करण्याचे काम केले जात आहे.
इफ्तार पार्टीत दगडफेक : कृपाल तुमाने
काल संध्याकाळी माझ्या घराजवळ इफ्तार पार्टी सुरू होती. काल विश्व हिंदू परिषदेचा मोर्चा दुपारी संपला मात्र काही समाजकंटकांनी दगडफेक सुरू केली होती. मोर्चा संपल्यानंतर दगडफेक करण्याचे काय कारण आहे.
दगडफेक झाली ही दुर्दैवी घटना : विजय वडेट्टीवार
नागपूरसारख्या शांत शहरात आज जाळपोळ झाली, दगडफेक झाली ही दुर्दैवी घटना आहे. गेले काही दिवस मंत्रिमंडळात एक मंत्री सतत वळवळ करत आहे, त्याच्या वक्तव्यामुळे दोन समाजात वाद निर्माण झाला आहे. या मंत्र्याची मंत्रिपदावरून त्वरित हकालपट्टी करावी अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
गृहमंत्र्यांचे अपयश : नाना पटोले
नागपूरमध्ये शांतता ठेवण्याची जबाबदारी सरकारची आहे. गृहमंत्री यांनी अशी दंगल घडणार आहे अशी माहिती असताना सुध्दा आधीच कारवाई का केली नाही, असा माझा सवाल आहे, असे काँग्रेसचे नेते नाना पटोले म्हणाले.