मुंबई : औरंगजेबाच्या कबरीवरून वाद पेटवण्याचे काम सत्ताधा-यांनीच केले. नागपुरात दंगा झाला हे पाप यांचेच आहे, असा थेट आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवारांनी भाजपवर केला. नागपूरमध्ये सर्वच जाती-धर्माचे लोक राहतात. यापूर्वी अशी परिस्थिती कधीच नव्हती. दोन समुदायांत द्वेष नव्हता. दोन समाजात भाजपने निर्माण केलेली दरी कमी करण्यासाठी काँग्रेस सद्भावना यात्रा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, काँग्रेसच्या वतीने बुधवारी (ता.१६) सद्भावना यात्रा काढण्यात येणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला हे या यात्रेत प्रामुख्याने सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर वडेट्टीवारांनी दीक्षाभूमी ते ताजबाग अशी यात्रा काढण्यात येणार असल्याचे सांगितले. तत्पूर्वी काँग्रेसने जारी केलेल्या पत्रकात महाल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून यात्रा काढणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
औरंगजेबाची कबर खणून काढावी यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. यावरून नागपूरमध्ये मोठी दंगल उसळली होती. पोलिस आणि लोकांवर दगडफेक करण्यात आली होती. गाड्यांची जाळपोळ करण्यात आली होती. ज्या पद्धतीने दंगलसदृश्य परिस्थिती उद्भवली होती त्यावरून यास कोणीतरी बाहेरून फूस दिल्याची शंका व्यक्त करण्यात आली होती.
या प्रकरणी मुख्य आरोपी फहीम खानच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचे घरही पाडण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने औरंगजेबाची कबर हटवणे अयोग्य असून आमचे समर्थन नसल्याचे जाहीर केल्यानंतर आक्रमक झालेल्या संघटना सध्या शांत झाल्या आहेत. मात्र विजय वडेट्टीवारांनी थेट भाजपवरच दंगलीचा आरोप केला. त्यामुळे सद्भावना यात्रेपूर्वीच वादाला तोंड फुटणार असल्याचे दिसून येते.
विजय वडेट्टीवारांनी लाडकी बहीण योजनेच्या रकमेत कपात केल्याने महायुती सरकावर टीका केली. जेव्हा योजना जाहीर केली तेव्हा सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का, असा सवाल त्यांनी केला. केंद्र शासनाकडून निधी दिला जातो म्हणून पैशात कपात करणे अयोग्य असल्याचे ते म्हणाले. निराधार महिलांना केंद्र सरकारकडून पंधराशे रुपयांची मदत दिली जाते. या योजनेचा लाभ उचलणा-या महिलांना आता लाडकी बहीण योजनेंतर्गत फक्त पाचशे रुपये दिले जाणार असल्याचे समोर आले आहे. दीड हजार रुपयांमध्ये घर चालते का, अशी विचारणा करून वडेट्टीवारांनी महायुती सरकारवर आरोप केले.