लातूर : प्रतिनिधी
लोकसभेला महाविकास आघाडी राज्यात विक्रमी मताने जिंकली तसेच विधानसभेलाही महाविकास आघाडी राज्यात जिंकेल असे सांगून येत्या विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती महानगरपालिकेच्या निवडणुकीत नाभिक समाज व बारा बलुतेदारांना काँग्रेस पक्षाकडून संधी देण्यात येईल. नाभिक समाज कायम आमच्या पाठीशी उभा आहे, नाभिक समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण करुन नाभिक समाजाला सर्वतोपरी मदत करु, असे प्रतिपादन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातुरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले.
लातूर शहरातील झिंगणप्पा गल्ली येथील महाराजा अग्रेसन भवन येथे श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त लातूर जिल्हा नाभिक समाजाच्या वतीने आयोजित केलेला नाभिक समाज बांधवाचा स्नेहमेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा झाला या प्रसंगी माजी मंत्री आमदार अमित देशमुख बोलत होते. अध्यक्ष अॅड. विजयकुमार चिखलीकर होते. तर माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, माजी नगरसेवक अशोक गोविंदपूरकर, भटके विमुक्त संघटनेचे प्रदेश अध्यक्ष हरिभाऊ गायकवाड, लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवींद्र काळे, ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, महाराष्ट्र नाभिक महामंडळ उपाध्यक्ष रामदास पवार, लातूर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब शेंद्रे, शहराध्यक्ष जगन्नाथ गवळी, रंगनाथ घोडके, हरिश्चंद्र पांचाळ, मकबूल वलांडीकर, प्रा. श्रीकांत मद्दे, अमोल सावंत, मनोज दिघे, अण्णा सुरवसे, महादेव माने, अशोक चिमकुरे, दीपक चापोलीकर आदीसह नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की राजकारणात समाजकारणात आमची कायम भूमिका सत्याची, न्यायाची असते. लातूरच्या हिताची आम्ही नेहमी भूमिका घेत असतो. लातूरची चौफेर भरभराट होत आहे, हीच लातूरची संस्कृती आहे. बारा बलुतेदारांना न्याय मिळाला पाहिजे ही काँग्रेस पक्षाची व नेत्यांची भूमिका आहे. महायुती सरकारकडील आपले काम करण्यासाठी तळागाळातील लोकांना पैसे द्यावे लागतात. महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन करणे गरजेचे आहे. लोकसभेला महाविकास आघाडी राज्यात विक्रमी मताने जिंकली तसेच विधानसभेलाही महाविकास आघाडी राज्यात जिंकेल. महायुती सरकारला लोकसभे अगोदर लाडकी बहीण योजना आठवली नाही. आमचा लाडकी बहीण योजनेला विरोध नाही सरकारला हातातून सत्ता जाईल याची भीती आहे. येत्या विधानसभा, जिल्हा परिषद पंचायत समिती, महानगरपालिकेच्या निवडणुकीत नाभिक समाज व बारा बलुतेदारांना काँग्रेस पक्षाकडून संधी देण्यात येईल. नाभिक समाज कायम आमच्या पाठीशी उभा आहे. नाभिक समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण करुन नाभिक समाजाला सर्वतोपरी मदत करु.
प्रारंभी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी वारकरी संप्रदायाचे महान संत श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त झिंगणप्पा गल्ली येथील श्री संत सेना भवनात जाऊन श्री संत सेना महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. या कार्यक्रमादरम्यान नाभिक समाजातील दहावी बारावी पदवी व पदवीत्तर परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी आमदार अमित विलासराव देशमुख यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र नाभिक महामंडळ लातूर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब शेंद्रे यांनी करुन समाजाच्या कार्याची माहिती सविस्तर सांगितली. माजी नगरसेवक अशोक गोविंदपूरकर, भटके विमुक्त संघटनेचे प्रदेश अध्यक्ष हरिभाऊ गायकवाड यांनी मनोगत व्यक्त्त केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पद्माकर चिंचोले यांनी केले तर मनोज वाघमारे यांनी आभार मानले.