विंडहोक : वृत्तसंस्था
दक्षिण आफ्रिकी देश नामिबिया सध्या गेल्या १०० वर्षांच्या इतिहासातील सर्वात भीषण दुष्काळाचा सामना करत आहे. यामुळे येथील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. येथील नागरिकांना दोन वेळचे अन्न मिळणेही अवघड झाले आहे. पिण्याच्या पाण्याचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारी धान्याची गोदामेही रिकामी झाली आहेत. कुठून तरी मदत मिळेल, अशी आशाही नाही, अशा संपूर्ण परिस्थितीमुळे सरकारही हतबल दिसत आहे. यामुळे, आता नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी येथील सरकारने काही प्राणी मारण्याचा निर्णय घेतला आहे.
आता नामिबिया सरकारने लोकांची भूक भागविण्यासाठी हत्ती आणि पाणघोड्यांसह ७०० हून अधिक वन्य प्राण्यांना मारण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात, देशाचे म्हणणे आहे की, ते या प्राण्यांपासून मिळणारे मांस नागरिकांमध्ये वितरित करणार आहेत. याचे मुख्य कारण नामिबियातील अन्न संकट आहे.
‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण आफ्रिकेतील बहुतांश भाग दुष्काळाने त्रस्त आहे. संपूर्ण प्रदेशात ३ कोटी पेक्षाही अधिक लोक प्रभावित झाले असल्याचे युनायटेड नेशन्स वर्ल्ड फूड प्रोग्रामने जूनमध्ये म्हटले होते.
हत्तींशिवाय, ३०० झेब्रा, ३० पाणघोडे, ५० इम्पाला, ६० म्हशी, १०० ब्लू वाइल्डबीस्ट आणि १०० एलँड मारण्याची देशाची योजना आहे. तसेच, नामिबियातील ८४ टक्के अन्न संसाधने आधीच संपली आहेत, असे संयुक्त राष्ट्राच्या प्रवक्त्यांनी गेल्या आठवड्यातच म्हटले होते.
५६,८०० किलो मांस सरकारला मिळालं!
नामिबियाच्या पर्यावरण, वनीकरण आणि पर्यटन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हे प्राणी राष्ट्रीय उद्याने आणि अशा भागातून येतील जेथे त्यांची संख्या अधिक आहे. या प्राण्यांना व्यावसायिक शिका-यांकडून मारले जाईल. काही कंपन्यांना कंत्राटही देण्यात आली आहेत. आतापर्यंत १५७ प्राण्यांची शिकार करण्यात आली असून यातून सरकारला ५६,८०० किलोपेक्षा अधिक मांस मिळाले आहे. हे मांस लोकांमध्ये वितरित केले जात आहे.