नाशिक : विधानसभा निवडणूक आटोपल्यानंतर देखील राजकीय घडामोडी सुरूच असल्याचे पाहण्यास मिळत आहेत. अनेक राजकीय पदाधिकारी पक्ष सोडून दुस-या पक्षात प्रवेश करत आहेत. यातच नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखासह सहा माजी नगरसेवकांनी शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
नाशिकमध्ये ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला असून मनमाडचे माजी नगराध्यक्ष व शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करीत भाजपचे कमळ हाती घेतले आहे. सहा माजी नगरसेवकांसह धात्रक यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महामंत्री विजय चौधरी, मंत्री जयकुमार रावल, रवींद्र चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे भाजप प्रदेश कार्यालयात प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादी शहराध्यक्षांनीही सोडला पक्ष
गणेश धात्रक यांच्यामुळे मनमाड, नांदगाव परिसरात ठाकरे गटाची ताकद वाढलेली होती. मात्र त्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र ठोकत भाजपमध्ये प्रवेश केल्याने ठाकरे गटाला निश्चितच मोठा धक्का मानला जात आहे. तर धात्रक यांच्यासमवेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष व मनमाड कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती दीपक गोगड यांनीही भाजपात प्रवेश केला.