मुंबई : प्रतिनिधी
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज, गुरुवारपासून (२७ जून) सुरू झाले आहे. येत्या तीन-चार महिन्यांत विधानसभा निवडणूक होणार असल्याने १४ व्या विधानसभेचे हे शेवटचे अधिवेशन आहे.
मात्र निरोपाच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. शुक्रवारी निरोपाच्या अधिवेशनात गाजर संकल्प सादर होईल, अशी घणाघाती टीका शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
अर्थमंत्री अजित पवार हे महाराष्ट्र राज्याचा वार्षिक अर्थसंकल्प २८ जून रोजी सभागृहात मांडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, या सरकारचे निरोप घेण्याचे अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्र या सराकारला बाय-बाय सरकार म्हणत आहे. या निरोपाच्या अधिवेशनात सरकारकडून शुक्रवारी काही घोषणा होण्याची शक्यता आहे. साधारणत: प्रथा आहे की, दरवर्षी केंद्रात आणि प्रत्येक राज्यात अर्थसंकल्प सादर केला जातो. त्या अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने ज्या योजना अथवा घोषणा त्यामध्ये समाविष्ट केलेल्या असतात. त्यासाठी आर्थिक तरतूद केली जाते. अर्थसंकल्प एका बाजूला म्हटल्यानंतर शुक्रवारी जो काही घोषणांचा पाऊस पडेल हा गाजर अर्थसंकल्प असणार आहे. कारण निधी खर्चच होणार नाही, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
आजपर्यंत घोषणा खूप झाल्या, पण घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ हे मी यापूर्वीसुद्धा म्हटलेले आहे. मात्र या सरकारला जरा तरी संवेदना असेल तर गेल्या दोन वर्षांत त्यांनी केलेल्या घोषणांची पूर्तता किती झाली हे खरेपणाने शुक्रवारी नीट सांगितले तरी मी म्हणेन खूप झालं.
या सरकारला आपण खोके सरकार आणि महायुती सरकार म्हणत आलो आहोत, पण केंद्र आणि राज्य हे त्यांच्याच भाषेत डबल इंजिन सरकार ते म्हणत असतील ही दोन्ही सरकार महागळती सरकार आहे. राम मंदिराच्या गाभा-यातसुद्धा गळती झाली आहे, पेपरफुटी झालेली आहे. पण आम्ही जर त्यांना काही प्रश्न विचारले आणि विषय त्यांच्यासमोर मांडले तर ते आमच्यावर आरोप करत आहेत. असे असले तरी या अधिवेशन काळात आमच्याकडून महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने जीवाभावाचे प्रश्न उपस्थित केले जातील, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.