निलंगा : प्रतिनिधी
निलंगा नगरपालिका प्रशासन नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत शहरातील शिवाजी नगर भागातील नागरिकांनी थेट पालिकेवर मुक मोर्चा काढत नगरपालिका कार्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलन केले.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील नाली सफाई करणे आवश्यक असताना शहरातील शिवाजीनगर भागातील नाली सफाई करण्यात आली नसल्याने पावसाचे पाणी नाल्यात जाऊन घाण पाणी थेट नागरिकांच्या घरात घुसले. नालीचे घाण पाणी सर्वत्र पसरल्याने घाणीचे साम्राज्य पसरुन सर्वत्र दुर्घंदी पसरली आहे. शहरातील सर्वत्र रस्ते करण्यात आले पण या भागात रस्ते ना नाली ना स्वच्छ पाणी पुरवठा केले जात आहे. घरातला पाय बाहेर टाकला की थेट घाणीत जात असल्याने मुल घराबाहेर पडत नाहीत. शाळेत जाताना त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. येत्या चार दिवसात सुविधा उपलब्ध करून न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनात प्रा. दयानंद चोपणे, विलास माने, अन्वर सौदागर, बाबा कुरेशी, एजाज शेख, अनिस शेख, सय्यद शेख, हलीमा शेख, खातून औटी, अस्लम शेख आदीसह तरुण व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.