मुंबई : वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनेही कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळाल्यानंतर काँग्रेस आता महाराष्ट्रात मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहे. राज्यात जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी काँग्रेसने मेगा प्लान तयार केला आहे.
या प्लॅननुसार काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत तळ ठोकणार आहेत. दोन्ही नेते महाराष्ट्रावर सर्वाधिक फोकस करणार असून राज्यात जास्तीत जास्त सभा घेणार आहेत. याशिवाय काँग्रेसच्या इतर वरिष्ठ नेत्यांचेही महाराष्ट्रावर लक्ष असणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या सभांचा महाराष्ट्रात धडाका उडवून देण्यात येणार आहे. राज्यात या दोन्ही नेत्यांच्या १५ ते २० सभा होणार आहेत. दोन्ही नेते प्रत्येक विभागात सभा घेणार आहेत. सोबतच काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांच्या देखील सभा होणार आहेत. सभांच्या अनुषंगाने राज्यातील नेत्यांनी केंद्राला आज सविस्तर माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, काँग्रेस नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसच्या आजच्या बैठकीची माहिती दिली. आज वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याशी राज्यातील परिस्थितीबाबतची चर्चा करून सर्व माहिती दिली. आघाडी संदर्भातही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यात आली आहे.