नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या नेत्यांचा आपल्या उमेदवारांसाठी प्रचार जोरात सुरू आहे. प्रचारामध्ये आदर्श आचारसिंहितेचे उल्लंघन होऊ नये म्हणून निवडणूक आयोग लक्ष ठेऊन आहे. अशातच आज निवडणूक आयोगाने भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना नोटीस पाटवून सूचना केल्या आहेत. दोन्ही नेत्यांना त्यांच्या स्टार प्रचारकांना कोणतेही वक्तव्य करताना सावधगिरी बाळगण्याची आणि शिष्टाचार राखण्याच्या सूचना देण्यास सांगण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणूकीत प्रचाराचा घसरलेला स्तर पाहता निवडणूक आयोगाने हे आदेश दिले आहेत. जात, समुदाय, भाषा आणि धर्माच्या आधारावर प्रचार करणा-या भाजप आणि काँग्रेसला आयोगाने फटकारले असून, पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या भाषणादरम्यान धार्मिक आणि जातीयवादी वक्तव्ये करू नयेत, अशी सूचना आयोगाने भाजपला केली आहे. समाजात फूट पाडणारी वक्तव्ये टाळावीत असेही म्हटले आहे. निवडणुकीच्या वेळी सत्ताधा-यांवर अतिरिक्त जबाबदारी असते, यावरही निवडणूक आयोगाने भर दिला.
संरक्षण दलांबाबत राजकारण करू नये-आयोग
निवडणूक आयोगाने काँग्रेस नेत्यांना बिनबुडाचे आरोप करू नयेत असे सांगितले आहे. प्रामुख्याने संविधान रद्द करणे आणि अग्निवीर योजना रद्द करण्यात येईल, असे वक्तव्य करू नये , असे आदेश देण्यात आले आहेत. यासोबतच संरक्षण दलांवर राजकारण करू नये, अशा स्पष्ट सूचना काँग्रेसच्या प्रचारक आणि उमेदवारांना देण्यात आल्या आहेत.