शिरूर अनंतपाळ : शकील देशमुख
यंदा पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील सोयाबीनपाठोपाठ तूर पिकालाही मोठा फटका बसला आहे. फुलोरा आणि शेंगा लागण्याच्या महत्त्वाच्या अवस्थेत पाण्याअभावी तूर पीक सुकून गेले असून, तालुक्यातील सुमारे ३ हजार हेक्टरवरील तुरीचा खराटा झाला आहे. त्यामुळे तूर उत्पादनात अंदाजे ९५ टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता असून शेतक-यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
शिरूर अनंतपाळ तालुक्यात यंदा एकूण ३ हजार ३४८ हेक्टर क्षेत्रावर तुरीचा पेरा झाला होता. सोयाबीननंतर तूर हे शेतक-यांसाठी महत्त्वाचे नगदी पीक आहे. सोयाबीनच्या उत्पादनात घट झाल्याने शेतक-यांची आर्थिक भिस्त तुरीच्या उत्पादनावर होती. मात्र पावसाने दडी मारल्याने तूर पीकही हातचे गेले आहे. सध्या तूर पीक पूर्ण बहरात येऊन फुलोरा आणि शेंगा लागण्याचा काळ आहे. या अवस्थेत पिकाला पुरेशा पावसाची गरज असते. मात्र जमिनीतील ओलावा संपल्याने तुरीची झाडे सुकली असून फुलोरा आणि शेंगधारणा प्रभावित झाली आहे. परिणामी उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतक-यांना सतावत आहे.
पाणी असूनही तूर वाचविणे कठीण
तालुक्यातील तुरीचे बहुतांश क्षेत्र कोरडवाहू आहे. तूर पीक वाचविण्यासाठी केवळ ६ टक्के शेतक-यांकडे पाण्याची उपलब्धता असल्याचे सांगितले जाते. एकूण तीन हजार ३४८ हेक्टर क्षेत्रापैकी अंदाजे ३४८ हेक्टरवरील तुरीला पाणी देण्याची क्षमता असली, तरी सध्याची पाणीटंचाई पाहता प्रत्यक्षात केवळ दहा हेक्टर क्षेत्रावरील पीक वाचविणे शक्य होण्याची शक्यता आहे.
















