मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांना मंगळवारी मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विशेषत: शिवसेनेने (ठाकरे) अविश्वास ठराव मांडला होता. मात्र, मंगळवारी नीलम गो-हे यांच्या विरोधातील अविश्वास ठराव सभापती राम शिंदे यांनी फेटाळून लावला आहे. सभापतींच्या निर्णयामुळे संतापलेले ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी यावर चर्चा करण्याची मागणी केली. परंतु, सभापती आपल्या निर्णयावर ठाम राहिले.
दिल्ली येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी गो-हे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आक्रमक झालेल्या महाविकास आघाडीकडून त्यांच्याविरोधात ४ मार्च २०२५ रोजी अविश्वासाचा प्रस्ताव विधिमंडळ सचिवांकडे सादर केला होता. तथापि, हा ठराव कायदेशीर बाबी आणि अधिनियमाच्या कक्षेत बसत नसल्याचे सांगत सभापतींनी तो फेटाळून लावला. त्यानंतर ठाकरे गटाचे आमदार यांनीही विधिमंडळाच्या अधिनियमांवर बोट ठेवत आक्रमक भूमिका घेतली. आम्ही ठराव सादर करताना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली असल्याने त्यावर चर्चा घेतली जावी, अशी विनंती त्यांनी केली. ती अमान्य करण्यात आली.
सभापतींनी निर्णय दिल्यानंतर अनिल परब यांनी केलेल्या चर्चेच्या मागणीवर मंत्री शंभुराज देसाई यांनी आक्षेप घेतला. सभापतींनी निर्णय दिल्यानंतर पुन्हा चर्चा करता येत नाही, असे देसाई म्हणाले. त्यावर आमच्या मागणीवर काय निर्णय द्यायचा हा सभापतींचा अधिकार आहे, मंत्र्यांना नाही. त्यामुळे तुम्ही सांगणारे कोण, असा सवाल परब यांनी केला. यावेळी दोघांमध्ये खडाजंगी झाल्याने सभागृहात काही काळ तणाव निर्माण झाला.
मराठी साहित्य संमेलनात ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमात बोलताना नीलम गो-हे म्हणाल्या की, कार्यकर्त्यांना कमी समजण्याचे कारण नाही. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी ठाण्यातून माणसे आणली जायची. गल्ला गोळा करण्याचे काम त्यांना (शिंदेंना) दिले होते. (उबाठाच्या शिवसेनेमध्ये) दोन मर्सिडीज दिल्या की पदे मिळायची, असा सनसनाटी आरोप नीलम गो-हे यांनी केला. तसेच ठाकरेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांनाच आम्ही नको झालो होतो, असेही विधान नीलम गो-हे यांनी केले होते. दरम्यान, विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व इतर सदस्यांनी विधान परिषदेत गो-हेंविरोधात अविश्वास ठरावाची सूचना दिली होती.