27.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeपरभणीनुकसानग्रस्त शेतक-यांना संपूर्ण मदत देण्यास सरकार कटीबद्ध : धनंजय मुंडे

नुकसानग्रस्त शेतक-यांना संपूर्ण मदत देण्यास सरकार कटीबद्ध : धनंजय मुंडे

परभणी : मराठवाड्यात मागील दोन-तीन दिवसात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर बुधवार, दि.४ सप्टेंबर रोजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील मानवत, पाथरी, सेलू आदी तालुक्यांमध्ये नुकसान झालेल्या स्थळी प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करत स्थानिक शेतक-यांशी संवाद साधला. राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतक-यांच्या पाठीशी आहे. नुकसानग्रस्त शेतक-यांना नुकसानीचा संपूर्ण मदत देण्यात सरकार कटीबध्द आहे असे आश्वासन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांना दिले.

पावसाच्या अतिप्रवाहाने तसेच नदीतील प्रवाहाचे पाणी शेत जमिनींमध्ये घुसल्यामुळे ब-याच ठिकाणी शेतक-यांच्या जमिनी मधील माती पूर्णपणे खरडून गेली आहे. त्याही शेतक-यांना पूर्णपणे मदत दिली जाईल असेही आश्वासन कृषीमंत्री मुंडे यांनी दिले.

दरम्यान कृषीमंत्री मुंडे यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी आदींना तात्काळ पंचनामे सुरू करून मदतीचे अहवाल राज्य शासनाकडे शक्य तितक्या लवकर पाठवावेत असे निर्देश दिले आहेत. आजच्या दौ-यात कृषीमंत्री मुंडे यांनी जिल्ह्यातल्या मानवत, पाथरी, सेलू तालुक्यातील एकुरका, पिंपळगाव, बोरगव्हान, कोष्टगाव, कोल्हा, ढेंगली पिंपळगाव, रेणापूर आदी गावांमध्ये भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली. कृषीमंत्री मुंडे यांनी यावेळी जिल्ह्यातील थकित पीक विम्याचेही तातडीने वितरण करण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत.

यावेळी आ.मेघना बोर्डीकर, आ.राजेश विटेकर, माजी आ.डॉ.मधुसूदन केंद्रे, मिथिलेश केंद्रे, अनिल नखाते, भावना नखाते यांच्यासह महसूल, कृषी व विमा कंपनीचे अधिकारी आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR