24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeसोलापूरनुकसानीचे पंचनामे अन् पीक कापणीनंतरही भरपाईची प्रतीक्षाच

नुकसानीचे पंचनामे अन् पीक कापणीनंतरही भरपाईची प्रतीक्षाच

सोलापूर: ‘एक रुपयात पीकविमा’ अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील सात लाख एक हजार ६४० शेतकऱ्यांनी खरीप हंगामात विमा उतरविला. जिल्ह्यासाठी विमा कंपनीला राज्य सरकारकडून १८८ कोटी ४१ लाख रुपये तर केंद्राकडून १३२ कोटी ८१ लाख रुपयांचा हिस्सा मिळाला. तर दुसरीकडे शेतकऱ्यांचा प्रत्येकी एक रुपया, असे एकूण ३२१ कोटी २९ लाख रुपये विमा कंपनीला मिळाले. मात्र, त्यापैकी अवघे १०५ कोटी रुपयेच शेतकऱ्यांच्या पदरात पडले असून उर्वरित २१६ कोटी रुपयांमधील एक दमडीही अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही.
पावसाळ्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने अनेक पिकांचे नुकसान झाले. त्यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार विमा कंपनीने जिल्ह्यातील बाधित एक लाख ७० हजार ९४५ शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम दिला. आतापर्यंत विमा कंपनीने शेतकऱ्यांना पिकांच्या भरपाईपोटी १०५ कोटी रुपयांची भरपाई वितरित केली आहे. पण, अद्याप तूर, कांदा, भुईमूग, कापूस या पिकांसाठी विमा कंपनीकडून भरपाई मिळालेली नाही. या पिकांना भरपाई द्यायची की नाही, हा विषय कृषी आयुक्तांपासून मंत्री आणि पुढे केंद्र सरकारपर्यंत पोचला. त्याठिकाणी शेतकऱ्यांना भरपाई देण्यासंदर्भातील आदेश झाले, पण अद्याप शेतकऱ्यांना पीकविम्याची प्रतीक्षाच आहे. जिल्ह्यात सध्या दुष्काळी स्थिती असतानाही सर्व बाधित शेतकऱ्यांना ना दुष्काळातील भरपाई मदत ना पीकविम्याचे पैसे, अशीच स्थिती पाहायला मिळत आहे.
अतिवृष्टी व पावसाचा खंड, यामुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील जवळपास ८० हजार शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे त्यासंबंधीची पूर्वसूचना दिली होती. त्यांच्या नुकसानीचे पंचनामे होऊन आता सहा-सात महिने झाले आहेत. दुसरीकडे खरीप पिकांच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ आकडेवारी पीक कापणी प्रयोगानंतर मिळते. त्यामुळे पीक कापणी प्रयोग देखील झाले, पण अद्याप या शेतकऱ्यांना भरपाई काहीही मिळालेली नाही.
 खरीप हंगामात सेती पिकांचा विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी। विमा कंपनीकडे पाठपुरावा सुरु आहे. नुकसानीची पूर्वसूचना दिलेले शेतकरी व पीक कापणी प्रयोगानंतर ज्यांचे नुकसान आले. त्या शेतकन्यांना भरपाई अपेक्षित आहे.असे  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी   दत्तात्रय गवसाने यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR