28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeसंपादकीयन्यूमोनियाचे चिनी भूत!

न्यूमोनियाचे चिनी भूत!

उपद्व्यापी चीन अख्ख्या मानव जातीसाठी धोकादायक बनला आहे. २०१९ मध्ये कोरोना महामारीची निर्मिती करून त्याने संपूर्ण जगाला वेठीस धरले होते. या महामारीच्या फटक्यातून जग अजून सावरलेले नाही. अनेक देशांच्या अर्थव्यवस्था रसातळाला गेल्या आहेत. त्यातून सावरण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता कुठे सावरतोय असे वाटत असतानाच एखादा चिनी उद्रेक असा काही समोर येतो की त्यामुळे जगभरात खळबळ उडते. आता असेच एक प्रकरण पुढे आले आहे. चीनमध्ये रहस्यमयी न्यूमोनियाचा उद्रेक झाला आहे म्हणे. तेथील मुलांमध्ये एन९ एन२ ची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. अनेकांना श्वसनाचे आजार जडले आहेत. लोकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे तसेच स्वच्छतेची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

श्वसनाचे आजार असल्यास अशा लोकांपासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे. कोरोनासारखाच या आजाराचा प्रसार होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या आजारांचा भारताला धोका कमी असून केंद्र सरकारचे याकडे बारकाईने लक्ष असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. भारतात असे कोणतेही प्रकरण अद्याप समोर आलेले नाही. चीनमध्ये न्यूमोनियाचा लहान मुलांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. मुलांमध्ये खोकला, सर्दी, ताप अशी लक्षणे दिसत आहेत. अशी लक्षणे दिसल्यास मुलांना शाळेत न पाठविण्याचा सल्ला दिला जात आहे. लहान मुलांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढल्याने चीनमधील परिस्थिती बिकट बनली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यू. एच. ओ.) त्याबद्दल चिंता व्यक्त केली. कोरोनामुळे बालकांच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम झाला आहे. परिणामी अशा प्रकरणांमध्ये पुन्हा वाढ होत आहे. मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. जागतिक आरोग्य संघटना चीनकडून तपशीलवार माहिती घेत आहे.

दरवर्षी हिवाळ्यापूर्वी न्यूमोनियासारख्या प्रकरणांची वाढ होताना दिसते. चीनच्या उत्तर भागात बालकांमध्ये श्वसनाचे विकार वाढले आहेत. उत्तर चीनमधील शैक्षणिक संस्थांमधून या रहस्यमय न्यूमोनियाचा उद्रेक झाल्याचे चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटले आहे. कोरोनासारखाच हा श्वसनविकार असून अनेक बालकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या श्वसनविकार वाढीचा संबंध इन्फ्ल्यूएन्झा, न्यूमोनिया, बॅक्टेरियाचा संसर्ग यांच्याशी जोडला जात असून हा आजार विशेषत: लहान मुलांना होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार बालकांमध्ये श्वसन आणि न्यूमोनियाशी संबंधित आजार आढळून आले आहेत. मात्र त्याची लक्षणे न्यूमोनियापेक्षा वेगळी आहेत. मुलांमध्ये तीव्र ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास आदी लक्षणे दिसून येतात. काही मुलांमध्ये फुफ्फुसाला सूज येणे, तीव्र ताप आणि श्वसनविकारासंबंधी अन्य लक्षणेही दिसून आली आहेत. चिनी अधिका-यांनी आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वी सार्स आणि कोरोनाची सुरुवातदेखील अशाच प्रकारच्या अज्ञात न्यूमोनियाने झाली होती. त्यामुळे या वेळी आरोग्य संघटना वेळीच सावध झाल्या आहेत. प्रो-मेडनामक प्लॅटफॉर्मने या गूढ न्यूमोनियाबद्दल इशारा दिला आहे.

प्राणी आणि मानवात पसरणा-या आजारांबद्दल या संकेत स्थळावर माहिती देण्यात येते. यापूर्वी प्रो- मेडने कोरोनाबद्दल डिसेंबर २०१९ मध्ये इशारा दिला होता. आता या गूढ न्यूमोनियाचा कोरोना महामारीप्रमाणे उद्रेक होऊ शकतो, असे प्रो-मेडचे म्हणणे आहे. चीनमधील बीजिंग आणि लिओनिंग येथील रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात बालकांना दाखल केले जात आहे. अनेक रुग्णालयांनी बालकांसाठी विशेष कक्षाची उभारणी केली आहे. अनेक रुग्णालयांत रुग्णशय्या कमी पडत आहेत. काही शहरांमध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. जर या आजाराचा वेगाने प्रसार झाला तर उत्तर चीनमध्ये सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे. म्हणजेच एकूण परिस्थिती आणीबाणीची दिसते. जागतिक आरोग्य संघटना एकूण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत नोंदविलेल्या ‘एन९ एन२’च्या प्रकरणांमध्ये एका व्यक्तीकडून दुस-या व्यक्तीकडे संसर्ग पसरण्याची शक्यता खूप कमी आहे. शिवाय या आजारामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही कमी आहे. कोरोना आजार देशभर पसरत असताना चिनी अधिका-यांनी डब्ल्यू.एच.ओ.ला अंधारात ठेवले होते, त्यामुळे अख्ख्या जगभरात हाहाकार उडाला होता. या वेळी तसे काही होऊ नये म्हणून जागतिक आरोग्य संघटना सतर्क आहे. नव्या आजारामध्ये कोणतेही असामान्य आणि नवीन विषाणू आढळले नसल्याची माहिती चीनने डब्ल्यू.एच.ओ.ला दिली आहे.

कोरोना प्रतिबंध हटविण्यात आल्याने फ्ल्यूसारख्या आजारात वाढ झाल्याचे चिनी प्रशासनाने म्हटले आहे. स्थानिक प्रशासनाने रुग्णालये बालरुग्णांनी भरल्याची माहिती दिली असली तरी याबाबतची कोणतीही आकडेवारी जाहीर केलेली नाही. न्यूमोनिया, इनफ्ल्यूएन्झा फ्लूच्या वाढत्या प्रकरणांमुळे घाबरण्याची गरज नसून ही जागतिक चिंता नसल्याचेही चीनकडून सांगण्यात आले आहे. चीनमधील नव्या आजारामुळे निर्माण होऊ शकणा-या कोणत्याही आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी भारत सज्ज असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. साम्राज्यवादी चीनचे आतापर्यंतचे एकूण वर्तन पाहता अनेक देश त्यांच्या कथनीवर विश्वास ठेवावयास तयार नाहीत. कारण चीनच्या ‘कथनी आणि करणी’त फरक असतो हे सारे जाणून आहेत. कोरोना कालावधीत काय झाले ते सारे जग जाणून आहे. त्यामुळे ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’नुसार प्रत्येक देशाने आपापल्या तयारीत राहायला हवे. या आजाराचा भारताला धोका कमी असल्याने भीती बाळगण्याचे कारण नसले तरी आपण आपल्या तयारीत असणे केव्हाही चांगलेच.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR