लातूर : ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्या नेतृत्वातील प्रसिद्ध संस्था ‘सह्याद्री देवराई’ चा सन २०२५ करिता विविध क्षेत्रांत उत्तम कामगिरी बजावणा-या महिलांना देण्यात येणारा प्रतिष्ठित ‘सावित्रीबाई फुले नारी शक्ती पुरस्कार’ येथील प्रसिद्ध वृत्तपत्र पुरोगामी विचाराचे ‘एकमत’ मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत असलेल्या शाहिदा स. पाशा पटवारी (पठाण) यांना जाहीर झाल्याची माहिती संस्थेच्या वतीने गुरुवार, दि. २६ डिसेंबर रोजी प्रसारमाध्यमांना देण्यात आली. सदर पुरस्काराचे वितरण सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ३ जानेवारी २०२५ रोजी लातूर येथील दयानंद कला महाविद्यालयात करण्यात येणार आहे.
सह्याद्री देवराई सामाजिक संस्था व इतर समविचारी सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून मागील काही वर्षांत दुर्मीळ वृक्ष संवर्धन, जंगल संवर्धन, निसर्गशाळेच्या माध्यमातून नवीन पिढीसाठी एक पर्यावरण संस्कार देत आहेत. या कार्यास राज्यातील महिला सदस्या विविध रूपाने सहकार्य करीत असतात. अशा कर्मरूपी महिला सदस्यांचा सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ३ जानेवारी २०२५ रोजी ‘सह्याद्री देवराई’तर्फे नारी शक्ती पुरस्कार देऊन यथोचित सत्कार करून गौरव करीत आहेत.
मराठवाड्यातील आपले संवेदनशील कार्य पाहून महिला शक्तीचा गौरव होणे गरजेचे असल्याने येथील शाहिदा पठाण(पटवारी) यांची सदर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून लातूर येथील दयानंद कला महाविद्यालयात शुक्रवार, दि. ३ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सदर पुरस्काराचे वितरण होणार आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पठाण यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.