पुणे : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. अखेर आज (शनिवार) हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. त्या ९२ वर्षांच्या होत्या. प्रभा अत्रे हे शास्त्रीय संगीत जगतातील अत्यंत प्रसिद्ध नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सांगता अत्रे यांच्या गायनाने होत होती. यंदाही त्या गाणार होत्या. मात्र आजारपणामुळे त्या कार्यक्रमाला जाऊ शकल्या नव्हत्या. शास्त्रीय संगीताचा वारसा जपलेल्या महान गायिका म्हणून त्या ओळखल्या जातात. अत्रे यांनी अनेक शिष्य घडवले आहेत.
अत्रे यांचा जन्म १३ सप्टेंबर १९३२ रोजी पुण्यात झाला. त्यांचे वडील दत्तात्रय पिलाजी हे पुण्यातील एका शाळेत मुख्याध्यापक होते. तर आई इंदिरा या शिक्षिका होत्या. पालक शिकवत असलेल्या शाळेतच त्यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांचे संगीत क्षेत्रातील पदार्पण हा योगायोग होता. प्रभा अत्रे या आठ वर्षांच्या असताना त्यांची आई आजारी पडली. त्यावेळी त्यांच्या कुटुंबाजवळच्या एका मित्राने त्यांना संगीतात चांगलं काम करू शकता, असे सुचवले होते. या गायनातूनच त्यांना छंद म्हणून शास्त्रीय संगीत शिकण्याची प्रेरणा मिळाली.
प्रभा अत्रे यांनी सुरेशबाबू माने आणि हिराबाई बडोदेकर यांच्याकडे संगीताचे प्रशिक्षण घेतले. किराणा घराण्याचे संस्थापक उस्ताद अब्दुल करीम खान यांची ती मुले होती. संगीताचे प्रशिक्षण घेत असतानाच अत्रे यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून विज्ञान शाखेत पदवी मिळवली. त्यानंतर लॉ कॉलेजमधून त्यांनी स्रातक पदवी संपादित केली. संगीत अलंकार आणि संगीत प्रवीण या पदव्याही त्यांनी मिळवल्या. अत्रे या ‘सूर संगम’सारख्या संकल्पनांवर आधारित मैफलींसाठी प्रसिद्ध होत्या.