परभणी : सगे सोय-याच्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करावे या मागणीसाठी शनिवार, दि.२४ फेब्रुवारी रोजी सकल मराठा समाजाने पुकारलेल्या रास्तारोको आंदोलनास संपूर्ण जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला. परभणी शहरातील विसावा कॉर्नर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे जिंतूर व पाथरीकडे जाणारी व येणारी वाहतूक पूर्णत: ठप्प होवून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच तालुक्यातील झरी, पोखर्णी नृसिंह, दैठणा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. याशिवाय तालुक्याच्या ठिकाणी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
परभणी शहरातील विसावा कॉर्नर या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने सकल मराठा समाज बांधव सहभागी झाले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत परीसर दणाणून सोडण्यात आल्या. यावेळी वाहतूक ठप्प होवून वाहनांच्या दूर पर्यंत रांगा लागल्याचे चित्र पहावयास मिळाले.
परभणी तालुक्यातील झरी, असोला, राहाटी, वाडी दमई व देवलगाव या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने जोरदार रास्तारोको आंदोलन करण्यात आले. झरी येथे जिंतूर ते परभणी राज्य महामार्गावर तसेच वाडी दमईच्या ग्रामस्थांनी झरी ते परभणी, असोला व रहाटीच्या ग्रामस्थांनी परभणी ते वसमत या राज्य महामार्गावर जोरदार रास्तारोको आंदोलन केले. दैठणा, नृसिंह पोखर्णी फाटा या दोन्ही ठिकाणी संतप्त आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत वाहतूक रोखून धरली. या आंदोलनाला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यश मिळाले.
पाथरी तालुक्यात संतप्त आंदोलनकर्त्यांनी ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन करीत वाहतूक रोखून धरली. यात तालुक्यातील वाघाळा फाटा, पोखर्णी फाटा, बाभळगाव फाटा, नाथरा फाटा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलने झाल्याचे समजते. या वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती.