जामखेड : प्रतिनिधी
अजित पवार रोहित पवार यांना म्हणाले की, मी सभा घेतली असती तर तुझे काय झाले असते? याचा अर्थ कर्जत-जामखेड मतदारसंघात नियोजित कट होता. राजकीय सारीपाटात कौटुंबिक कलह आणि कटाचा मी बळी ठरलो, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते राम शिंदे यांनी अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर दिली. वरिष्ठांनी याची दखल घेत योग्य निर्णय घ्यावा, असे म्हणत शिंदे यांनी या कटात अजित पवार सहभागी असल्याचा संशय माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघात शरद पवारांचे नातू रोहित पवार अवघ्या १२४३ मतांनी विजयी झाले. भूमिपुत्र असलेले भाजपचे आमदार राम शिंदे यांनी कडवी झुंज देत पवारांची दमछाक केली. निकालानंतर आज कराड येथे अजित पवार आणि रोहित पवार यांची भेट झाली. थोडक्यात वाचलास… मी सभा घेतली असती तर काय झालं असतं तुझं? असे अजित पवार यावेळी रोहित पवारांना म्हणाले. त्यांच्या वक्तव्यानंतर राम शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.
कौटुंबिक कलह आणि अघोषित करार होऊन त्याची अंमलबजावणी झाल्याचे कर्जत-जामखेडमध्ये जाणवत आहे. मी कटाचा बळी ठरलो. महायुतीचा धर्म मोठ्शस नेत्यांनी पाळणे आवश्यक होते. मी सभेला आलो असतो तर काय झाले असते, असे त्यांनी (अजित पवार) बोलणे म्हणजे हा सुनियोजित कट होता. महायुतीच्या लोकांबरोबर असं होत असेल तर बरोबर नाही, असे राम शिंदे यांनी म्हटले आहे.
मतमोजणीसंदर्भात तक्रार केली
मतमोजणी संबंधी तक्रार केली मात्र ती फेटाळली असून जिल्हाधिका-यांकडे पुन्हा अर्ज करणार आहे. मतदारसंघात पैसे आणि इतर गोष्टींचे वाटप झाले यासंदर्भात देखील तक्रार केली आहे. राजकीय सारीपाटात मी बळी ठरलो. असेही शिंदे म्हणाले.