25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरपशुधनांची संख्या घटली; जमिनीला मिळेना शेणखत

पशुधनांची संख्या घटली; जमिनीला मिळेना शेणखत

जळकोट : ओमकार सोनटक्के
रासायनिक खतांच्या अतिवापराचे धोके लक्षात घेता देशभरासह राज्यात सेंद्रीय शेतीबाबत जनजागृती केली जात आहे. सरकारही गंभीर असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे तालुक्यातील पशुधनाची संख्या सातत्याने कमी होत असल्याने शेणखताचा तुटवडा निर्माण होत असून, रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. परिणामी, जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम होत आहे.
तीस-चाळीस वर्षापूर्वी बहुतांश शेतक-यांकडे पशुधन होते. प्रत्येकाच्या घरी एखादं दुसरी दुभती गाय, म्हैस असायची. शेतमजूर असेल तर एखादी शेळी तरी असायचीच, त्यामुळे प्रत्येक शेतक-याला घरचे शेणखत मिळायचे किंवा काही शेतकरी शेणखत विकत घ्यायचे. आता पशुधन कमी होत असल्याने शेणखत मिळणे अवघड झाले आहे. मिळाले तर विकतचे शेणखत न परवडणारे आहे. त्यामुळे रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करूनच शेतकरी शेती कसताना दिसून येत आहेत .
रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमीन नापीक बनण्याचा धोका वाढला आहे. शेणखताचा तुटवडा, सेंद्रीय खतांची अनुपलब्धता, आदी कारणांमुळे नैसर्गिक शेती कसणे शेतक-यांना शक्य नाही. तरीही काही मोजकेच शेतकरी शेणखत, कंपोस्ट खत, हिरवळीची खते, गांडूळ खत, माशांचे खत आदी सेंद्रीय खतांचा वापर करतात. तेही शेतात घरच्यापुरते अन्नधान्य व भाजीपाला पिकविण्याकरिता करताना दिसत आहेत. मोठे शेतकरी थोड्या-थोड्या शेतात प्रत्येकी तीन वर्षांनंतर शेणखताचा वापर करताना दिसत आहेत. काही शेतकरी जमिनीची सुपीकता वाढावी म्हणून तळ्यातील गाळ किंवा नदीकाठाची तांबडी माती आणून त्याचा वापर करीत आहेत. सध्या तरुण पिढी शेतात राबत आहे. वेगवेगळे प्रयोग शेतामध्ये केले जात आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR