लंडन : वृत्तसंस्था
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, लंडनमधील पाकिस्तान उच्चायोग कार्यालयावर दगडफेक झाली आहे. याशिवाय लंडनपाठोपाठ अमेरिका, बलुचिस्तान, पाकव्याप्त काश्मिर, गिलगीटमध्येही पाकिस्तान विरोधी लोकक्षोभागाचा उद्रेक उसळला आहे. पाकिस्तानातील सामान्य जनतेनेही भारताच्या बाजूने भूमिका घेतली आहे. यामुळे सत्तारुढ पाकिस्तानी सरकारची कोंडी झाली आहे.
उच्चायोग इमारतीच्या खिडक्यांची तोडफोड करण्यात आली आहे. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. या प्रकरणी भारतीय वंशाच्या अंकित लव्ह याला अटक केली आहे. तो ४१ वर्षांचा आहे. रविवारी २७ एप्रिल रोजी त्याच्यावर गुन्हेगारी नुकसानीचा आरोप ठेवण्यात आला आहे. लंडनमधील पोलिसांनी ही माहिती दिली. हा प्रकार पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर घडला आहे. या घटनेवरून लंडनमध्ये भारतीय आणि पाकिस्तानी समुदायाकडून निदर्शने करण्यात आली.
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर लंडन, मँचेस्टर आणि बेलफास्टमध्ये भारतीय समुदायातर्फे श्रद्धांजली सभांचे आयोजन केले होते. रविवारी लंडनमधील भारतीय उच्चायोगासमोर मोठ्या प्रमाणावर निदर्शने आयोजित करण्यात आली होती. पाकिस्तानी समुदायाच्या वतीने सुरू असलेल्या लहान निदर्शनांना उत्तर देण्यासाठी या निदर्शनांचे आयोजन केले होते. तेथील पाकिस्तानी समुदायाने पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा हात हा भारतीय प्रोपगंडा असल्याचे म्हटले आहे.
पाकव्याप्त काश्मीर, गिलगिटमध्ये निदर्शने
पाकव्याप्त काश्मीर, गिलगिटमध्ये पाकिस्तान विरोधात हजारो स्थानिकांनी एल्गार पुकारला आहे. पाकिस्तानमध्ये स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी सैन्यांवर अत्यंत क्रूर पद्धतीने बलोच बंडखोरांकडून हल्ले सुरू आहेत. कधी रेल्वे हायजॅक, तर कधी पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला अशा पद्धतीने बलूच लिबरेशन आर्मीकडून सातत्याने पाकिस्तानी सैन्याला लक्ष्य केलं जात आहे. यामध्ये अनेक सैनिक मृत्युमुखी पडले आहेत. ही भयावह स्थिती असतानाच आज पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुद्धा असंतोष उफाळून आला आहे. हजारो नागरिक पाकिस्तान सरकार विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्याकडून पाकिस्तान सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.