
नौशेरा :
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमारेषेवर प्रचंड तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानी लष्कराकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला गेला. त्याला भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. अशातच एक महत्त्वाची माहिती समोर आली की, पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनी सीमारेषेजवळील चौक्या रिकाम्या केल्या असून चौक्यांवरील झेंडेही उतरवले आहेत. याद्वारे पाकिस्तानने युद्धापासून माघार पत्करली असा संकेत मिळत असल्याचे म्हटले जात आहे.
नौशेरा, सुंदरबनी, अखनूर, बारामुल्ला आणि कुपवाडा या भागातील अनेक ठिकाणी पाकिस्तानी लष्कराकडून गोळीबार करण्यात आला आहे. पहलगामच्या घटनेनंतर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असून, त्याला आता भारतीय लष्कराकडूनही उत्तर दिले जात आहे.
मंगळवारी (२९ एप्रिल) रात्री जवळपास सीमेरेषेलगतच्या २० चौक्यांवर तुफान गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानी सैन्याने भारतीय लष्कराच्या चौक्यांना लक्ष्य करत हा अंदाधुंद गोळीबार केला. सीमेलगत असलेल्या पाकिस्तानच्या काही चौक्या रिकामा झाल्या आहेत. या चौक्यावर तैनात असलेले जवान निघून गेले असून, त्या चौक्यांवरील झेंडेही उतरवण्यात आले आहे. ज्याचा अर्थ माघार घेतल्याचे संकेत असल्याचे मानले जाते.