लातूर : प्रतिनिधी
अद्यावत तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञांची मदत घेऊन पाण्याचे योग्य पद्धतीने शुद्धीकरण करून लातूर शहरात स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशा सूचना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर महानगरपालिकेतील आढावा बैठकीदरम्यान केल्या आहेत. लातूर शहरात नळाद्वारे गढूळ आणि पिवळे पाणी वितरित होत असल्याच्या नागरिकाकडून येत असलेल्या तक्रारीची दखल घेऊन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दि. १६ एप्रिल रोजी सकाळी खासदार डॉ.शिवाजी काळगे यांच्यासह महानगरपालिकेत जाऊन आयुक्त, उपायुक्त, नगर अभियंता, पाणीपुरवठा विभागाचे संबंधित अधिकारी यांची आढावा बैठक घेतली.
सदरील आढावा बैठकीच्या प्रारंभी आमदार अमित विलासराव देशमुख यांनी धरणातील पाण्याची उपलब्धता, पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक यासंदर्भात माहिती घेतल्यानंतर, पिवळे पाणी वितरित होण्याबाबतच्या कारणांची माहिती जाणून घेतली, धरणातील पाणी शेतीसाठी कॅनॉलद्वारे सोडल्यानंतर, पाण्यात मोठ्या हालचाली होऊन, शेवाळे वरच्या बाजूला येतात, या शेवाळ्यांचा तीव्र उन्हाशी संपर्क आल्यानंतर, शेवाळ्याचा रंग पाण्यात उतरत असल्याचे बैठकीदरम्यानसांगण्यात आले.
पाण्याचा रंग पिवळा पडत असला तरी ते पिण्यास योग्य असल्याचा खुलासाही महापालिका प्रशासनाकडून यावेळी करण्यात आला. नळाला गढूळ आणि पिवळे पाणी येणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यात तातडीने सुधारणा करावी, आवश्यक त्या तंत्रज्ञानाची उपलब्धता करावी, कोणत्याही परिस्थितीत यापुढे असे पाणी वितरित होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सक्त सूचना आमदार अमित विलासराव देशमुख यांनी यावेळी संबंधितांना दिल्या आहेत. पिवळे पडत असलेले पाणी पिण्यास योग्य आहे असा महापालिका अधिका-यांचा दावा असला तरी, नागरिक हे पाणी पिण्यास धजावत नाहीत त्यामुळे सर्व प्रकारच्या उपयोजना करून स्वच्छ पाणीपुरवठा करावा असे निर्देश आमदार देशमुख यांनी यावेळी दिले.
लातूर शहरातील खाजगी रुग्णालयाच्या उभारणीत आणि नंतर रुग्णालयांना परवाना देण्यात महापालिकेकडून येत असलेल्या अडचणी संदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनने दिलेल्या निवेदनासंदर्भात त्वरित कार्यवाही करावी, इतर महानगरातील नियमावली लक्षात घेऊन, समस्या सोडवण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाचे कार्यवाही करावी, असे आमदार देशमुख यांनी यावेळी सांगितले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क विकासाचा सर्वंकष आराखडा तयार करण्याच्या यापूर्वीच सूचना दिल्या आहेत, हा आराखडा त्वरित तयार करावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य पुतळा बनवण्याची जबाबदारी महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्याकडे सोपवावी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याशेजारी उभारावा, हुतात्मा स्मारक, मराठवाडा मुक्ती संग्राम स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज वाचनालय, मिनी मार्केटमधील दुकानासाठी स्वतंत्र कॉम्प्लेक्स या व ईतर सर्व आवश्यक्य सोयी सुविधांसह हा विकास आराखडा तयार करण्यात यावा व त्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
नवीन रेणापूर नाका परिसरात नाल्याचे पाणी थांबून निर्माण होत असलेल्या अडचणींची सक्षम अधिका-याने जाऊन तातडीने पाहणी करावी आणि ती समस्या सोडवावी, नागरिकांच्या तक्रारीची तातडीने दखल घ्यावी, शहरात घंटागाडी कार्यक्षमतेने काम करील याची दक्षता घ्यावी, शहरातील विविध विकास योजनांची कामे दर्जेदार पद्धतीनेच व्हावीत, यात असंवैधानिक लोकांचा हस्तक्षेप खपवून घेऊ नये आदि सूचनाही या बैठकीदरम्यान माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी केल्या आहेत.
या आढावा बैठकीस महापालिका आयुक्त देविदास जाधव उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे, पाणीपुरवठा विभागाचे शहर अभियंता विजयकुमार चव्हाण, मुख्य लेखापरीक्षक कांचन तावडे, मुख्य लेखाधिकारी रावसाहेब कोलगाने, जनसंपर्क अधिकारी रुक्मानंद वडगावे, नागरिकांच्या शिष्टमंडळाच्या वतीने माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, लातूर आयएमए प्रतिनिधी डॉ. सतीश देशमुख लिंगायत समाज शिष्टमंडळ प्रमुख बसवंतआप्पा भरडे, फेरीवाला समितीचे अध्यक्ष गौस गोलंदाज, नवीन रेनापुर नाका परिसरातील नागरिकांच्या वतीने विष्णुदास धायगुडे आदिसह संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.