मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणात आता पुन्हा खळबळ उडाली आहे. राज ठाकरेंच्या या वक्तव्यावरून आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या की, मी खूप वेळा म्हटले आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे राजकारणी असण्याआधी एकमेकांचे भाऊ आहेत. पाण्यात काठी मारल्याने पाणी तुटत नाही.
दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहेत. राज ठाकरे यांचे वक्तव्य आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणे, आमच्यातील गोष्टी किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही एकत्र येणे आणि एकत्र राहणे यामध्ये मला काही फार कठीण गोष्ट आहे असे वाटत नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
त्यांच्या या वक्तव्यावर बोलताना अंधारे म्हणाल्या, कुटुंब म्हणून ते एकत्र आहेत. राजकारणी म्हणून एकत्र यायचं की नाही यावर निश्चित चर्चा होऊ शकते.
दोघंही एकत्रित यावे अशी महाराष्ट्रातील प्रत्येक शिवसैनिकाची इच्छा आहे. मात्र ते एकत्र येत असताना एक स्वतंत्र अस्मितेचं राजकारण उभे करायचे की भाजपचे मांडलिकत्व पत्करायचे म्हणून आमच्यासोबत चला म्हणून म्हणायचे हा खरा कळीचा मुद्दा ठरणार आहे. ज्या भाजपाने महाराष्ट्राची अस्मिता, संस्कृती या सगळ्यांना मोडीत काढण्याचा अत्यंत क्रूर खेळ चालवला आहे. त्या भाजपासोबत कदाचित इतर लोक तडजोड करू शकतील. राज साहेबांसाठी मात्र आम्ही कायम सकारात्मक असू.