रेणापूर : प्रतिनिधी
पानगाव येथील विश्वरत्न महामानव बोधीसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र ‘अस्थी कलशा’ ला दरवर्षी ६ डिसेंबरला (महापरिनिर्वाण दिनानिमित्त) अभिवादन करण्याकरिता लाखो आंबेडकरी अनुयायांची मोठी गर्दी होत असते. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ट्रस्टच्या वतीने विषेश नियोजन करण्यात
आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांनी दिली.
विश्वभूषण भारतरत्न प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६ डिसेबर २०२४ हा महापरिनिर्वाण दिन आहे. या दिवशी पानगाव येथील आंबेडकरनगरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थींचे दर्शन घेऊन पवित्र अस्थी कलशाला अभिवादन करण्यासाठी मराठवाड्यासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्यातून लाखो महिला-पुरुष आंबेडकरी अनुयायी येत असतात. त्यानिमित्ताने पानगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ट्रस्ट आणि येथील समाज बांधवांच्या पुढाकारातून दरवर्षी विविध कार्यक्रम राबविले जातात. यावर्षीही त्याचे आयोजन करण्यात आले आहे.
६ डिसेंबरला सकाळी अस्थिकलशा जवळ सामूहिक पंचशिल त्रिशरण, बुद्धवंदना, समता सैनिक दलाची सलामी, व ध्वजारोहण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रात्री भीम गीतांचा कार्यक्रम होणार आहे. आंबेडकरी आनुयायांना अस्थी कलशाचे अभिवादन करण्यासाठी कसल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ट्रस्ट, सुमता सैनिक दल, पोलिस प्रशासन, स्वंयसेवक यांच्या माध्यमातून शिस्तीत व रांगेत अभिवादनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या दिवशी विशेष दक्षता घेण्यासाठी जिल्हाधीकारी, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, रेणापूरचे तहसीलदार, पोलिस निरीक्षक, ग्रामपंचायत पानगाव यांना निवेदने देण्यात आली आहेत. खरोेळा फाटा ते पानगाव या रस्तावरून मोठी वाहतूक असते. हा राष्ट्रीय महामार्ग अत्यंत खराब झालेला आहे. संबंधित विभागाकडून या रस्त्याची डागडुजी करण्यात यावी म्हणून ट्रस्टच्या वतीने निवेदने देण्यात आली आहेत, तसेच महावितरण विभागालाही अखंडित विद्युत पुरवठा ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे.
सर्वांना अस्थिकलशाचे दर्शन घेऊन अभिवादन करता यावे यासाठी ट्रस्ट व समाजाच्या वतीने वेगवेगळ्या समित्यांचे गठन करण्यात आले आहे. या समितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो, भदंत पय्यांनंद थेरों, नामदेव आचार्य, विश्वनाथ आचार्य, दशरथ आचार्य, प्रल्हाद रोडे, सुकेश भंडारे, के.ई. हरिदास, सुभाष आचार्य, जे. सी. पानगावकर, विष्णू आचार्य, गोरोबा आचार्य, नागनाथ चव्हाण, किशोर आचार्य, गौतम आचार्य, पंडित आचार्य, रमेश तिगोटे, सत्यशिला आचार्य, तुकाराम कांबळे, शिवाजी आचार्य, रत्नराज आचार्य आदींचा समावेश आहे