लातूर : विनोद उगिले
संघटित गुन्हेगारी, वाढत्या घरफोड्या बरोबरच नेहमीच याना त्या कारणाने सातत्याने चर्चेत राहणारा लातूर जिल्हा आता वेगळ्याच आणि तितक्याच गंभीर प्रकरणामुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या मुलींच्या पलायन प्रकरणाचा सखोल अभ्यास केल्यानंतर उपवर अर्थात वयात आलेल्या १५१ मुली या २०२३ या मावळत्या वर्षामध्ये प्रेमप्रकरण आणि अन्य कारणांतून घरातून पळून गेल्या असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. गत दोन वर्षांत लातूर जिल्ह्यातील तब्बल २५४ मुली याच कारणावरुन पळून गेल्याचे आकडेवारी सांगते. त्यामुळे पालकांनो सावधान; आपापल्या मुली सांभाळा, अशी म्हणण्याची वेळ आता आली आहे.
बदलती लाईफ स्टाईल, सोशल मीडियाचा वाढता अतिरेक व कामाच्या व्यापात पाल्यांशी तुटलेला पालकांचा संवाद या सगळयांमुळे आजची तरुण पिढी वाया जात असल्याच्या तक्रारी नेहमीच होत असतात. याच तक्रारींचे किती गंभीर स्वरुपात रुपांतर होत आहे, हे लातूर जिल्ह्यातील विविध कारणांमुळे घरातून पळून जाणा-या मुला-मुलींच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे.लातूर जिल्ह्यातील विविध भागांतून गेल्या दोन वर्षांतील पळून गेलेल्या मुली महिलांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यानंतर असे दिसून येत आहे की, शहरातून गत दोन वर्षांत तब्बल २५४ हून अधिक अधिकृतरित्या मुली महिला पळून गेल्या असून गत वर्षभरात पळून जाण्याचा हा आकडा वाढतच चालला आहे. अलीकडे घरातून मुलगी पळून गेल्याची किंवा त्या मुलीला फूस लावून पळवून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. अशाप्रकारच्या घटना का घडत आहेत याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर हे भीषण वास्तव समोर आले असून बहुतांश सर्वाधिक मुली या प्रेमप्रकरणांतून पळून गेल्याचे आढळून आले, तर काही मुली या घरातील माता-पित्यांमधील विसंवादामुळे पळून जात असल्याचे चित्र ही समोर आले.