27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रपिझ्झा घेऊन पोलिस स्टेशनमध्ये जाता, ही मस्ती घरी दाखवायची

पिझ्झा घेऊन पोलिस स्टेशनमध्ये जाता, ही मस्ती घरी दाखवायची

सुप्रिया सुळेंची सुनील टिंगरेंवर जहरी टीका

पुणे : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बोरसे अपघात प्रकरणावरून सुनील टिंगरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. मद्यधुंद अवस्थेत पोर्शे कार चालवत दोघांचा बळी घेणा-या अल्पवयीन कारचालकाला वाचविण्याचा प्रयत्न टिंगरे यांनी केल्याचा आरोप करण्यात आला होता. इतकेच नाही तर पोलिस स्टेशनमध्ये टिंगरे हे आरोपीसाठी बिर्याणी आणि पिझ्झा घेऊन गेल्याने शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संतप्त टीका केली आहे. त्या पुण्यातील लोहगावमध्ये बोलत होत्या.

दरम्यान, पोर्शे कार अपघातानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे चर्चेत आले आहेत. तर अल्पवयीन कारचालकाच्या रक्ताची अदलाबदल करण्यासाठी सुनील टिंगरे यांनी ससून रुग्णालयातील डॉक्टरांना फोन केल्याचा आरोपही करण्यात आला होता.

याप्रकरणी पुणे पोलिसांनी सुनील टिंगरे यांची चौकशीही केली. याच प्रकरणावरून काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी टिंगरे यांच्यावर टीका केली होती. वडगाव शेरीवाल्यांनी तर काही बोलूच नये. कुठल्या तोंडाने ते आता मतं मागणार आहेत. त्यांच्या दोन्ही हातावर रक्त आहे. माझा त्यांच्यावर हा गंभीर आरोप आहे. ज्या दोन लोकांचा यात जीव गेला त्यांच्या आई-वडिलांचा कधी विचार केला का? त्यांच्या आई-वडिलांना, कुटुंबांना काय वाटत असेल याचा कधी विचार केलाय का? त्यांच्याकडे पैसे आहेत, पोर्शे गाडी आहे म्हणून तुम्ही त्यांची बाजू घेताय? हे चालणार नाही. मी स्वत: त्यांच्या विरोधात प्रचार करून जंग जंग पछाडणार. या अपघातात ज्यांचा मृत्यू झालाय त्यांच्या आईला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे आई-वडील मध्य प्रदेशात राहतात. त्यांचे अश्रू पुसण्यासाठी तुम्ही जाणार आहात? तुम्ही बिर्याणी आणि पिझ्झा घेऊन पोलिस स्टेशनमध्ये जाता, हे पोलिस स्टेशन आहे तुमच्या घरातला डायनिंग टेबल नाही. ही मस्ती तुमच्या घरी दाखवायची. सर्वसामान्यांच्या अश्रूसमोर तुमची मस्ती नाही चालणार. कोट्यवधी रुपयांची पोर्शे गाडी आहे. कुठल्या पैशाने घेतली देवाला ठाऊक. मात्र याच गाडीने दोघांचा जीव घेतला. या दोघांची काय चूक होती? ते गरीब होते ही चूक होती की दुचाकीने जात होते ही चूक होती? गरिबांच्या आयुष्याची ही किंमत कराल आणि पोर्शेवाल्याला बिर्याणी खायला घालाल. हे चालणार नाही. अशी प्रवृत्ती असणा-यांना यावेळेस घरी पाठवण्याची जबाबदारी वडगाव शेरीकरांवर असणार आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR