सोलापूर : शहरातील गुन्हेगारांचा शोध घेण्याच्या दृष्टीने पेट्रोलिंग करीत असताना गुन्हे शाखेच्या पथकाला सोमवारी दमाणी नगर, लक्ष्मीपेठ परिसरात लाल कारमध्ये देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन वावरणाऱ्या एका तरुणाला पथकाने अटक केली. त्याची झडती घेतली असता कमरेला खोचलेले पिस्तूल आणि पँटच्या खिशात १० जिवंत काडतुसे सापडली. बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याने त्याला अटक करण्यात आली. मनोज बिभीषण सुरेराव (वय- ३८, शेती, रा. लक्ष्मी पेठ, दमाणी नगर, सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. यातील गुन्हे शाखेच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील व त्यांचे सहकारी चोरट्यांचा शोध घेत असताना त्यांना खबऱ्याकडून लक्ष्मी पेठ, दमाणीनगर परिसरात एक लाल रंगाची कार आणि त्या चालकाकडे पिस्तूल असल्याची खबर मिळाली.
पथकाने तातडीने घटनास्थळी पोहचून सापळा लावला. त्याच्याजवळ जाऊन विचारणा केली असता त्याने आपले नाव मनोज बिभीषण सुरेराव असल्याचे सांगितले. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे पिस्तूल आणि उजव्या पँटमधील खिशामध्ये १० जिवंत काडतुसे आढळून आली. चौकशीअंती बेकायदेशीररित्या ते बाळगले असल्याचे निष्पन्न झाले. पथकाकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे, कार असा ७ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी सदर चालकाविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, सहा. पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप पाटील, श्रीनाथ महाडिक, पोलिस अंकुश भोसले, विजयकुमार वाळके, महिला पोलिस अर्चना स्वामी, विद्यासागर मोहिते, गणेश शिंदे, सुभाष मुंढे, शैलेश बुगड, अभिजित धायगुडे, आबाजी सावळे, निलोफर तांबोळी, रत्ना सोनवणे, सायबरचे अविनाश पाटील, चालक बाळासाहेब काळे यांनी केली.