कराची : वृत्तसंस्था
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. पाकव्याप्त काश्मीर मध्येही भीतीचे वातावरण आहे, चौधरी अन्वर-उल-हक याने याबाबत संकेत दिले आहेत. जर परिस्थिती आणखी बिकट झाली तर या प्रदेशात आणीबाणी लागू केली जाऊ शकते, असे संकेत दिले आहेत.
भारताकडून संभाव्य लष्करी कारवाईच्या भीतीमुळे सुरक्षा परिस्थिती लक्षात घेता नीलम व्हॅली आणि नियंत्रण रेषेजवळील संवेदनशील भागात पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच धार्मिक मदरसे १० दिवसांसाठी बंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
भारताने आक्रमण केल्यास अन्न, औषधे आणि इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली आहे, असा दावा पीओकेच्या पंतप्रधानांनी केला आहे. आपत्कालीन निधीत एक अब्ज रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत आणि हॉटेल्स, गेस्टहाऊस आणि लग्नगृहांच्या चालकांनी त्यांच्या मालमत्ता सैन्याला देण्याचे ठरवले आहे.
नीलम व्हॅली आणि नियंत्रण रेषेच्या आसपासच्या संवेदनशील भागात असलेले मदरसे १० दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय अधिका-यांनी घेतला आहे. भारत या संस्थांना दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे म्हणून संबोधून त्यांना लक्ष्य करू शकतो अशी भीती पाकिस्तानला आहे.
पाकिस्तानने वाघा बॉर्डरचे गेट उघडले
भारत-पाकिस्तानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एलओसीवरून मोठी अपडेट मिळाली आहे. पाकिस्तानने गेल्या काही दिवसांपासून बंद केलेले अटारी, वाघा बॉर्डरचे गेट पुन्हा उघडले आहे. पाकिस्तान भारताने देश सोडून जा असे सांगितलेल्या पाकिस्तानी नागरिकांना आपल्या देशात घेण्याचे देखील बंद केले होते. आता सीमेवरच ताटकळलेले नागरिक त्यांच्या देशात जाऊ लागले आहेत.