पुणे : प्रतिनिधी
राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या ४८ तासांत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने पुढील २४ तासांत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात सोसाट्याच्या वा-यांसह मुसळधार पावसाची शक्यता असल्याने काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट आणि काही ठिकाणी यलो अलर्ट जारी केला आहे.
पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. पाणी साचले, वाहतूक कोंडी झाली आणि वीजपुरवठा खंडित झाला. यावेळी किमान तापमान ३४.५ अंश सेल्सिअस होते. हवामान खात्याने पुढील २४ तासांत पुण्यात सोसाट्याच्या वा-यांसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यात गेल्या ४८ तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी वादळाने हजेरी लावली. शहराजवळील यवतेश्वर घाटात वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, वीजपुरवठा खंडित झाला आणि एक मोबाईल टॉवर कोसळला. गेल्या २४ तासांत साता-यात तब्बल ५६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पुढील २४ तासांतही सोसाट्याच्या वा-यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात वादळासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील २४ तासांत कोल्हापूरमध्ये कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२ अंश राहील. कोल्हापूर घाटांवर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
सोलापूर जिल्ह्यात सोसाट्याच्या वा-यांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोलापूरमध्ये काही ठिकाणी पूर्व मान्सून पावसाची नोंद झाली. पुढील २४ तासांत कमाल तापमान ३४ अंशांवर राहण्याचा अंदाज आहे. वादळाची शक्यता असल्याने भारतीय हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
सांगली जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासांत वादळांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात जिल्ह्यातील कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. हवामान खात्याने ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवला आहे. गेल्या २४ तासांत सकाळी आणि सायंकाळी ५ नंतर जिल्ह्यात सोसाट्याच्या वा-यांसह मुसळधार पाऊस पडला.