पिंपरी : प्रतिनिधी
‘कुणीतरी अफवा उठवतो, २६ जानेवारीला २१ जिल्हे जाहीर केले जाणार…’ मात्र, आता एकही जिल्हा जाहीर केला जाणार नाही. आता जे चाललेय ते चांगले चाललेले आहे. ज्यावेळेस वाटेल, त्यावेळेस सरकार निर्णय घेईल. आता तरी कोणताच जिल्हा निर्माण करण्यात येणार नाही. त्यामुळे पुणे जिल्ह्याचेही विभाजन होणार नाही,’ अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा विभाजनाच्या चर्चेला पूर्णविराम दिला.
दरम्यान, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी भाषणात पुणे जिल्ह्याचे विभाजन झाल्यास नवीन जिल्ह्यास ‘शिवनेरी’ नाव द्यावे, भविष्याचा विचार करता पिंपरी-चिंचवड शहरासाठी नवीन जलस्रोत निर्माण करावेत, अशा मागण्या केल्या. तोच धागा पकडून अजित पवार म्हणाले की, आता तरी कोणताच जिल्हा निर्माण करण्यात येणार नाही. त्यामुळे पुणे जिल्ह्याचेही विभाजन होणार नाही. २०५४ ला पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या पुण्यापेक्षा जास्त होणार आहे. त्यामुळे शहराला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणार आहे. सध्याच्या पाण्याचा पुरवठा कमी पडणार आहे. भविष्याचा विचार करता शेजारील टाटांच्या धरणातील पाणी घ्यावे लागेल. समुद्राचे पाणी प्रक्रिया करून पिण्यासाठी वापरता येईल का, असाही विचार सुरू आहे.
होर्डिंग्जवर कारवाई करा : फडणवीस
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यासह विविध शहरांमध्ये अनधिकृत जाहिरात फलक, होर्डिंग्जचे प्रमाण वाढले आहे. त्यावर उपाय म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेने कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून सुरू केलेला होर्डिंग्जचा शोध आणि सर्वेक्षण प्रणाली महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे अनधिकृत होर्डिंगवर सहज कारवाई करणे शक्य होणार आहे.